रायगड | 27 ऑगस्ट 2023 : मुंबई-गोवा महामार्ग काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 17 वर्षांनंतरही मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी का लागत नाही? असा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मनसेच्या या पदयात्रेत राज ठाकरे याच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या आहेत. त्यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले.
चंद्रावर जास्त खड्डे की मुंबई गोवा महामार्गावर ते तुम्हीच येऊन पाहा… या महामार्गाच्या कामात 15 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हे ऐवढे पैसे गेले कुठे? आम्ही इशारा देतोय की, यावेळी अत्यंत संयमाने ही जागर पदयात्रा काढली आहे. हा इशारा आहे. नाहीतर पुढे मनसे आक्रमक होईल. मग आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. तुम्ही कीतीही केसेस करा. काहीही करा. पण या महामार्गासाठी आम्ही आक्रमक राहणारच आहोत, असंही अमित ठाकरे म्हणाले.
रविंद्र चव्हाण यांनी उत्तर द्यावं की हा रस्ता का बनला नाही. हा जुनाच रस्ता आहे. त्यावर पाणी कीती खड्डे आहेत. प्रश्न असा आहे की हा रस्ता नेमका कधी तयार होणार? पण आता मनसे याबाबत शांत बसणार नाही. यापुढे मनसे आक्रमक भूमिका घेईल. शेवटचं सांगतोय, ही पदयात्रा शांततेत काढलीये, पण इथून पुढचा मोर्चा शांततेत होणार नाही. आम्ही शांततेत नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेली 17 वर्षे पूर्ण न झालेला मार्ग पाहून मनसे जागर यात्रेत कोकणच्या रस्त्यावर उतरला आहे. हे लोक बोलतायत पूर्ण करतोय. मग एखादा पॅच दाखवावा जो व्यवस्थित आहे. पण असं दिसत नाही. भ्रष्टाचार झाला हे एवढ्या वर्षात दिसत आहे. बॅनर मधून देखील दिसतं आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
सरकारशी याबाबत चर्चा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा. यांच्याशी चर्चा काय करणार? खळ खट्याक काय करणार इथे लोकांचे गुडघे लोकांचे तुटायला लागलेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.