राज ठाकरे कडाडले, जागा देणारे ते कोण? 20 नाही 200 जागा…
आपण विधानसभेच्या 20 जागा महायुतीकडे मागितल्या आहेत अशी पुडी कुणीतरी सोडली. 20 च जागा का? आणि कोण देणार? विधानसभेला आपण 200 ते 225 जागा लढवत आहोत.
शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते. पण, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकांना पटले नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला खडे बोल सुनावले आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीत काय घडलं याची माहितीही त्यांनी दिली. तुमच्या भांडणात बाळासाहेबांना आणू नका असे अमित शाह यांना मी सांगितले होते असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचा शुक्रवारी 14 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र, आजपासूनच त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची रांग लागली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
गेल्या दोन दिवसांपासून कुणीतरी पुडी सोडली की मनसेने विधानसभेसाठी 20 जागा मागितल्या. विधानसभेच्या जागा मागण्यासाठी मी कुणाच्या दारात जाणार नाही असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, आपण विधानसभेच्या 20 जागा महायुतीकडे मागितल्या आहेत अशी पुडी कुणीतरी सोडली. 20 च जागा का? आणि कोण देणार? विधानसभेला आपण 200 ते 225 जागा लढवत आहोत असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला झालेले मतदान हे मोदी विरोधातून झाले आहे. महाविकास आघाडीवरील प्रेमातून झालेले नाही. शिवसेना UBT ला मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही. तर, मुस्लिमांनी मतदान केले. शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते. पण, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकांना पटले नाही. अमित शाह यांना प्रत्यक्ष भेटीत हे मी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तुमचे जे काही राजकारण करायचे ते करा. पण, या राजकारणात बाळाहेबांना आणू नका. बाळासाहेबांना मानणारा आजही महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे असे त्यांना स्पष्ट सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार मुंबईमध्ये होते. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मांडण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.
मनसे नेते आणि सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बैठक माटुंगा येथील रंगशारदा सभागृहात होनर आहे. अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. निवडणूक आयोगच्या प्रक्रियेनुसार पक्षाच्या अध्यक्षांची निवड या बैठकीत होणार आहे अशी माहिती दिली. तसेच, महाविकास आघाडीची सुपारी कोणी घेतली आणि संजय राऊत कोणाची सुपारी घेऊन बोलत आहेत हे अख्या देशाला माहित आहे अशी टीकाही संजय राऊत यांच्यावर केली.