‘राज’गर्जनेपूर्वी पुण्यात मेघगर्जना, मनसेची पहिलीच सभा रद्द
पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सभा (Raj Thackeray Pune Rally) होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सभा रद्द करावी लागली.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. पुण्यात आयोजित केलेली पहिलीच सभा पावसामुळे रद्द झाली आहे. राज ठाकरेंच्या सभास्थळी पावसामुळे पाणी (Raj Thackeray Pune Rally) साचलं आहे. पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सभा (Raj Thackeray Pune Rally) होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सभा रद्द करावी लागली.
विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेली मनसे आजपासून प्रचारांचा धडाका सुरु करणार आहे. पुण्यातील सरस्वती विद्यालयाच्या मैदानात मनसेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला मैदान मिळण्यात अडचण येत असताना आता मिळालेल्या मैदानात पाण्याचं साम्राज्य आहे.
रात्रभर झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी हे पाणी मोटार लावून बाहेर काढलं. पण नंतरही पाऊस झाल्याने पुन्हा पाणी साचलं. यामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलही झाला होता.
विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना, भाजप यांनी प्रचारांचा धडाका सुरु केला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या सभेचा श्रीगणेशा करण्यासाठी पुण्यात मैदान मिळताना अडचण येत होती.
पहिल्या सभेसाठी लकी नंबर
पहिल्या सभेसाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो. त्यामुळे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नऊ तारखेचा मुहूर्त मनसे निश्चितच चुकवणार नाही असं चित्र होतं. पण पावसामुळे हा मुहूर्त हुकला.
पुण्यात ‘राज’गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना
कोथरुड मतदारसंघातून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात मनसेने किशोर शिंदे यांना तिकीट दिलं आहे. विरोधीपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे राज ठाकरेही उत्साहाने या ठिकाणी सभा घेणार होते.
राज ठाकरेंच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याचा दावा मनसेने केला होता. शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती; मात्र ती नाकारण्यात आली. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याचंही मनसेने सांगितलं होतं.
‘शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानेच मिळत नाहीत’ असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतील उमेदवार अजय शिंदे यांनी केला होता.