शिवसेना-भाजप आणि राज ठाकरेंनी वर्षापूर्वी व्यंगचित्रातून वर्तवलेलं भाकित
गेल्या वर्षी अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र चर्चेत आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना-भाजप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष चर्चेचा विषय ठरत आहेत. परंतु अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटलेलं एक कार्टून सोशल मीडियावर पुन्हा वायरल होत आहे. गेल्या वर्षी अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र (Raj Thackeray Cartoon on Mahayuti) चर्चेत आलं आहे.
राज ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांपासून व्यंगचित्राच्या माध्यमातून सद्य परिस्थितीवर फटकारे मारलेले नाहीत. मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी रेखाटलेलं एक चित्र सध्याच्या परिस्थितीवर बोलकं ठरत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ‘अवनीची शिकार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना माज आला असून, 2019 मध्ये महाराष्ट्रच त्यांची शिकार करेल, असा हल्ला राज यांनी व्यंगचित्रातून चढवला होता.
वर्षभरापूर्वीच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढलं होतं. त्यामध्ये त्यांनी विधानसभेत जनताच तुमचा माज उतरवेल, असं भाकित वर्तवलं होतं. जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला असला तरी भाजप-शिवसेना यांच्यात फाटाफूट झाल्यामुळे राज ठाकरेंचा अंदाज खरा ठरल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.
#AvniTheTigress #SudhirMungantiwar #DevendraFadanvis #UddhavThackeray #BJPShivsenaAllianceGovt pic.twitter.com/cKJu059j0p
— Raj Thackeray (@RajThackeray) November 13, 2018
राज ठाकरे यांनी वर्तवलेलं भाकित शिवसेना-भाजप युतीच्या बाबतीत अचूक ठरल्याची भावना नेटिझन्सनी व्यक्त केली आहे. ‘वाघिणीला मारायची गरज नव्हती. तिला बेशुद्ध करता आलं असतं. वाघाचे पुतळे उभे करुन वाघ वाचत नाहीत’ असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली. pic.twitter.com/O6G7YlYKRL
— saurabh shende (@saurabh78960824) November 13, 2019
यवतमाळमध्ये पांढरकडा भागात अवनी वाघिणीची दहशत गेल्या वर्षी निर्माण झाली होती. सहा वर्षांच्या वाघिणीने 14 जणांचा जीव घेतल्याचा आरोप होता.
अनेक पशुप्रेमींनी अवनी वाघिणीला वाचवण्याची धडपड केली, मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवे मारण्यात आलं होतं. दीड महिने अवनीचा शोध सुरु होता, परंतु अवनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकवा देत होती.
अवनीचा शोध घेताना पथकातील एक सदस्य शेख यांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट अवनीला लागला, पण तिने मागे जात पुन्हा हल्ला केला. स्वरक्षणासाठी असगर यांनी 8 ते 10 मीटर अंतरावरुन गोळी झाडली. त्यात अवनीचा जागीच मृत्यू झाला.
सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय दिला होता. शोधमोहिमेदरम्यान नाईलाज झाला तरच वाघिणीला ठार केलं जावं. त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. पण तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न व्हावा, असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. परंतु प्रशासनाने तिला पडकण्याचा प्रयत्नच केला नाही, तिला ठारच करण्यात आलं, असा आरोप प्राणीहक्क कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर राज ठाकरेंसह विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी (Raj Thackeray Cartoon on Mahayuti) टीका केली होती.