Raj Thackeray: राज ठाकरेंसह इतर कुणावर गुन्हे दाखल, एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं?
राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण आणि वैयक्तिक टीका केल्या प्रकरणी कलम 116, 117, 153 आणि सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी घालू दिलेल्या बहुतांश अटींचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळतेय. त्याबाबतचा अभ्यास करुन राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात (Aurangabad Police) राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण आणि वैयक्तिक टीका केल्या प्रकरणी कलम 116, 117, 153 आणि सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) राज ठाकरे यांची औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य सभा झाली होती. पोलिसांनी या सभेसाठी एकूण 16 अटी घातल्या होत्या. त्यातील एका अटीत 15 हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, राज यांच्या सभेला 1 लाखा पेक्षा अधिक लोक उपस्थित असण्याचा अंदाज आहे. तसंच राज यांना वैयक्तिक टीका नको अशीही अट घातली होती. मात्र, या दोन्ही अटींसह एकूण 12 अटींचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राज ठाकरेंवरील दाखल गुन्ह्याचे विवरण
1. पोलीस स्टेशन – सिटीचौक 2. फिर्यादी – पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे, सिटी चौक पोलीस स्टेशन 3. गुरन – 127/2022 कलम 116, 117, 153 भादवि 1873 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, सुधारीत 31 जुलै 2017 4. ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यांचे नाव – राज ठाकरे, राजीव जेवळीकर आणि इतर आयोजक 5. तपास आधिकारी – अशोक गिरी, पोलीस निरीक्षक, सिटी चौक पोलीस स्टेशन
राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे औरंगाबादेतील सभेनंतर आता राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं मनसे नेत्यांचं मत आहे.
सांगलीत राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट!
दरम्यान, सांगलीतील शिराळा कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढले होते. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप त्यावर काही कारवाई केली नव्हती. 28 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आललं यासंबंधीचं पत्र आज समोर आलं असून 2008 सालच्या एका प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे कोर्टासमोर चौकशीसाठी हजर राहतील का, असा प्रश्न आहे.
Maharashtra | Magistrate Court in Shirala, Sangli had issued a non-bailable warrant against MNS chief Raj Thackeray on April 6, in connection with a case of 2008 u/s IPC 143, 109, 117, 7 in the Criminal Amendment & 135 of the Bombay Police Act. (1/2)
(File photo) pic.twitter.com/0Hv3gbBO82
— ANI (@ANI) May 3, 2022