महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारला अनेक टोले लगावले आहेत (Raj Thackeray on MahaVikasAghadi Government.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारला अनेक टोले लगावले आहेत (Raj Thackeray on MahaVikasAghadi Government. मुंबईसह संपूर्ण राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग होणार आहे यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच केलं.
राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीनंतर कोण कुणाकडे गेलं, कुणी सत्ता स्थापन केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्रात जे काही राजकारण झालं तो महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आता महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यभर होणार की कुठं हे बघू. आधी त्यांचा हनिमून पिरीयड संपू द्या.”
निवडणुकीसाठी ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं, त्यांना जनतेनं पाडलं. निवडणुकीच्या काळात ही खूप चांगली गोष्ट दिसली. मात्र, त्यानंतरही या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी हे वाईट आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो, असंही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
“यशाला बाप खूप असतात, पराभवाला सल्लागार खूप असतात”
राज ठाकरे यांनी निवडणुकीतील माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत टोला लगावला. ते म्हणाले, “24 तारखेच्या (24 ऑक्टोबर 2019) निकालानंतर शरद पवारांच्या सभेची सर्वाधिक चर्चा झाली. या काळात कोण चाणक्य झालं, कोण योद्धे झालं. हे 23 तारखेपर्यंत कोणी म्हणत नव्हतं. शिवाय 25 तारखेनंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल जे बोललं जातंय, तेही 23 तारखेपर्यंत कोणी बोलत नव्हतं. यशाला बाप खूप असतात, पराभवाला सल्लागार खूप असतात.”
“अमित शाहांचं अभिनंदन, नागरिकत्व कायदा करुन मंदीवरुन लक्ष हटवण्यात यश”
एनआरसी आणि कॅब या विषयाला वेगवेगळे कंगोरे आहेत. आज देशात जे मोर्चे निघत आहे, दंगेसदृश स्थिती आहे, जाळपोळ होत आहे, यातील किती जणांना हे माहिती आहे याबद्दल शंका आहे. या कायद्याबद्दल अमित शाह यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवत याकडे गुंतवून ठेवलं. जर आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येतं, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.