Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Mar 09, 2022 | 8:15 PM

निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर बोट ठेवलं.

Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकांबाबत (Municipal Election) मोठा दावा केलाय. निवडणुकांचे फटाके आता दिवाळीनंतरच वाजतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर बोट ठेवलं.

‘ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं’

निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते.

दोन वर्षे खूप वाईट गेली…

दोन वर्षे कुठेही भाषण केलं नाही. मुलाखती दिल्या. कुठे पाच मिनिटं बोललो, दहा मिनिटं बोललो पण भाषण नाही दिलं. दोन वर्षापूर्वी आपण आझाद मैदानावर मोर्चा काढला तेव्हा माझं शेवटचं भाषण. त्यानंतर दोन वर्षात मी ही बोललो नाही, तुम्ही पण बोलला नाहीत. आज आपल्या पक्षाला 16 वर्षे पूर्ण होत आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. इथून पुढची वाटचाल आपण चांगली करू असा विश्वास देतो. लॉकडाऊन झालं, कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू. रस्त्यावर शुकशुकाट होता. सगळेजण घाबरुन घरात बसले होते. सहज स्पर्श करायलाही भीती वाटू लागली. घरातील माणसाने दिलेला पाण्याचा ग्लासही घेताना संशय वाटत होता.

‘कोकिळा कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असं ओरडू लागल्या’

मार्चमध्ये लॉकडाऊन लागला तेव्हा दोन दिवसानंतर माझ्या मुलीला घेऊन मी व्हरंड्यात बसलो होतो. तेव्हा फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता… फक्त पक्षांचे आवाज होते. मला वाटतं की पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन ठेवा असं सांगावं वाटतं. सकाळी कोकिळा कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असं ओरडू लागल्याचा भास होत होता. ती शांतता भीतीदायक होती पण पण कुटुंब जवळ आली. एकमेकांसोबत जेवायला गुप्पा मारायला लागली.

‘तुमचे धन्यवाद देतो की या काळातही तुम्ही माझ्यासोबत राहिलात’

ते संकट केवळ देशावर नाही तर जगावर होतं. आपल्यावर तर संकटं चालूच आहेत. संकटं येतात तेव्हा ती हातात हात घालून येतात. जाताना एकएकटी जातात त्यामुळे वेळ लागतो. माझ्या, पक्षाच्या आयुष्यात आली. असे प्रसंग येत असतात. त्यांना न घाबरता त्यातून आपण काय घेतलं हे शिकलं पाहिजे. मी खास करुन तुम्हाला सांगतो, मी तुमचे धन्यवाद देतो की या काळातही तुम्ही माझ्यासोबत राहिलात. चढउतार येत असतात, मी मागे बोललो होतो की जगातील प्रत्येक मोठ्या व्यक्तीला वाईट दिवस आले, बॅड पॅच आले. एकच व्यक्ती ज्याला कधी वाईट दिवस आले नाहीत, त्यांचा ग्राफ सदैव उंचावत गेला त्या म्हणजे आमच्या लतादीदी.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर घणाघात

आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे… सॉफ्ट टार्गेट बनवलं त्यांना. आम्हाला इतिहास बघायचा नाही आम्हाला जात बघायची आहे. राज्यातील राजकीय पक्ष तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवतात. या माणसाने काय कष्ट घेतले. शिवाजी नाव ऐकलं तरी काही तरी सापडेल म्हणून हा माणूस तिकडे कही मिळेल म्हणून जायचा. ते आमचे राज्यपाल त्यांना काही समज बिमज आहे का, मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा वाटलं की ते माझा हात बघायला लागतील… कुडमुडे जोशी असतात ना… तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज, रामदास स्वामी. आपल्याला काही माहिती नाही.

‘ईडीची धाड पडली की काहींची श्रीमंती कळते’

शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरु होते किंवा स्वामींनी कधी कुठे सांगितलं नाही की शिवाजी महाराज माझे शिष्य होते. रामदास स्वामींनी छत्रपतींबाबत लिहिलं ते माझ्या घरी लावलं आहे. ते आजवर कुणी कधीही लिहिलेलं नाही. वाचा ते ‘निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितींचा निर्धारू श्रीमंत योगी’… आमच्याकडे योगी सापडत नाही. धाड पडली ईडीची की कळतं श्रीमंत आहे. नको तिथे बोटं घालायची यांना सवय आहे. मला काही कळत नाही. बाकी सगळे आहेतच आपको क्या लगता है, आपको क्या लगता है म्हणत कोंबड्या झुंजवायला मोकळे, अशा शब्दात राज यांनी माध्यमांनाही टोला लगावला.

इतर बातम्या :

महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू, मलिकांच्या राजीनाम्यावरून चंद्रकांत पाटलांचा इशारा

‘उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही’, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन प्रकाश आंबेडकरांचा घणाघात