मुंबई पोलिसांना 48 तास द्या; राज ठाकरे यांचं पुन्हा आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी 48 तास मुंबई पोलिसांचे हात मोकळे सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारकडं केलं आहे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी 48 तास मुंबई पोलिसांचे हात मोकळे सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारकडं केलं आहे (Raj Thackeray on Mumbai Police). यावेळी त्यांनी राज्य सरकारला याविषयी सांगून उपयोग नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणाही साधला. राज ठाकरे यांच्या आजच्या (9 फेब्रुवारी) आझाद मैदानावरील मोर्चाला महाराष्ट्रभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
राज ठाकरे म्हणाले, “देशात काही हिंदू, काही दलित आणि आदिवासी आहेत त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते या देशातीलच आहेत. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. मी केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना 48 तास हात सोडून द्या. ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील.”
पोलिसांवर हात टाकायला यांची हिंमत होती. आता यांच्यावर हात टाकायला किती वेळ लागेल? त्यावेळी रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी या ठिकाणी बांगलादेशी माणसाचा पासपोर्ट सापडला. फक्त बांगलादेशातून 2 कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणाहून किती घुसखोर आले याची काहीच माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो. आज त्यांचं मोठं षडयंत्र सुरु आहे. एक जागा आहे जिथं परदेशातील मुल्ला मौलवी येत आहेत. मी याची माहिती गृहखात्याला देणार आहे. पोलीस खात्यातूनच मला ही माहिती मिळाली आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
‘मुंबईत 1992-93 मध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या दाऊदला पाकिस्तान सांभाळत आहे’
राज ठाकरे यांनी यावेळी दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. त्यात अनेक माणसं मारली गेली. या सर्व बॉम्बस्फोटामागे कोण होतं? मुंबईत 1992-93 मध्ये बॉम्बस्फोट झाले. हे सर्व बॉम्बस्फोट दाऊदने केले. त्याच दाऊदला पाकिस्तान सांभाळत आहे. तिकडच्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना नागरिकत्व दिलं जात आहे. एक आंतरराष्ट्रीय करारानुसार अल्पसंख्यांकांना घ्यावं लागतं. तिकडच्या मुस्लिमांना कसं घेणार?”
संबंधित व्हिडीओ: