मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी ते आज रुग्णालयात दाखल होतील. आज लीलावती रुग्णालयात राज ठाकरे (Raj Thackeray in Lilawati Hospital) यांना ऍडमीट करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया (Raj Thackeray Operation) देखील करण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी आपल्या पुण्यातील सभेतून दिली होती. दरम्यान, आज रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर उद्या (बुधावारी) शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या दुखण्यानं त्रास होत होता. हे दुखणं वाढल्यामुळे आणि वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र पायाचं दुखणं वाढल्यानं शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यानुसार राज ठाकरे यांना रुग्णालयात ऑपरेशनच्या एक दिवस अगोदर भरती होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
पायाचं दुखणं वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपल्या ऑपरेशन बाबतही सविस्तर माहिती दिली होती. 5 जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचंही राज ठाकरेंनी नंतर स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की,
मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या होत्या. या टेस्टनंतर डॉक्टरांनी मला मला हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. एक जूनला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणारे. म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली. तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे लीलावती रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. नारायण राणे यांच्यावर लिलावती रुग्णालाय अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर नारायण राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.