पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच मनसेची आघाडीशी हातमिळवणी निश्चित होणार?
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी सुरू झालेल्या या दौऱ्यात राज ठाकरे पुण्यातील आठ विधानसभांमधील शाखाप्रमुखांशी चर्चा करत आहेत. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची, की आघाडीसोबत जायचं याबाबत पदाधिकाऱ्यांची ते मतं जाणून घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना […]
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. रविवारी सुरू झालेल्या या दौऱ्यात राज ठाकरे पुण्यातील आठ विधानसभांमधील शाखाप्रमुखांशी चर्चा करत आहेत. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची, की आघाडीसोबत जायचं याबाबत पदाधिकाऱ्यांची ते मतं जाणून घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना विरोधात रान उठवलं होतं. राज ठाकरे आता विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत जाईल, असा काहींचा अंदाज आहे, तर काही जणांकडून स्वबळाचाही दावा केला जातोय. पण राज ठाकरे यासाठी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत. गेल्या दोन दिवस राज यांनी पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आघाडीसोबत अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र या सभांचे मतांमध्ये परिवर्तन झालेलं दिसत नाही. त्यामुळे आता मनसेने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात ही पुण्यापासून सुरू झाली आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून आगामी विधानसभेची रणनीती आखणार आहेत. त्यामुळे राज नेमकी काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील काही नेत्यांनीही मनसेने आघाडीत यावं, असं मत व्यक्त केलंय. मुंबईत नुकतीच आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती. यावेळी मतांचं विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी भूमिका मांडण्यात आली होती.