तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल," असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं (Raj Thackeray On Nanded MNS City President suicide) आहे.
मुंबई : मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावर यांनी 16 ऑगस्टला आत्महत्या केली. याप्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोट इरावर यांनी लिहिली होती. या घटनेनंतर राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे. (Raj Thackeray On Nanded MNS City President suicide)
“अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरुन जातं.., असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिक सुनील इरावर यांच्या आत्महत्येनंतर केलं आहे.
“अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं…” महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर ह्यांच्या आत्महत्येनंतर मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरेंचं भावनिक आवाहन. #महाराष्ट्रसैनिक #संघर्षयोद्धा https://t.co/kpeU7fNYZ4
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 17, 2020
राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र.
“संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.
सुनील ईरावर या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. ‘
अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.
मी या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा… त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत… या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे… असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.
सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.” असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे.
मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या
नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या मनसेचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. इरावार यांनी शनिवारी 15 ऑगस्टला रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
अखेरचा जय महाराष्ट्र
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’
“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील”
“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो.” असे सुनील इरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेनंतर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. (Raj Thackeray On Nanded MNS City President suicide)
संबंधित बातम्या :
“राजसाहेब मला माफ करा” सुसाईड नोट लिहित मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या