राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसे नेत्यांची गोची! पुण्यात मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक नाराज?
राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता पुण्यातील मनसे नेत्यांची गोची होत असल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर नाराज असल्याची माहिती मिळतेय.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ गुढीपाडवा मेळाव्यात धडाडली. राज यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत मशिदीवरील भोंग्यालाही विरोध केला. या सरकारला मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता पुण्यातील मनसे नेत्यांची गोची होत असल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर नाराज असल्याची माहिती मिळतेय.
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्यामुळे या दोघांची मोठी अडचण होणार असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत बोलण्यास मात्र या दोघांनी नकार दिलाय. या पार्श्वभूमीवर मनसेची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे यांच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
राज ठाकरेंचा नेमका आदेश काय?
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असं युरोपातील शासन आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
‘मला आरे ला कारे करणारा समाज हवा’
आमच्याकडे मंदिरं आहेत. टाका धाडी. काय मिळणार… घंटा. आमच्याकडे काहीच नाही. म्हणून मला जातीत खितपत पडलेला असा फरफटत जाणारा असला समाज नाही आवडत. असल्या लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही. मला आरे ला कारे करणारा समाज हवा. कोणत्याही सत्ताधाऱ्यांची हिंमत होता कामा नये तुमच्याशी गद्दारी करायची, अशी आक्रमक भूमिकाही राज यांनी शिवतीर्थावरुन मांडली.
इतर बातम्या :