“बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे हे पदरही उलगडायला हवेत”, आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचं अभिवादन
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचं अभिवादन...
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन (Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din )आहे. सर्वचजण त्यांना विविध माध्यमातून अभिवादन करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पदर उलगडायला हवेत, असं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात.
तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत.
बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम !
-राज ठाकरे