Raj Thackeray Speech : ‘शरद पवार नास्तिक हे त्यांच्या कन्येनंच लोकसभेत सांगितलं’, राज ठाकरेंचा दावा; तर पवारांवर पुन्हा एकदा जातीवादाचा आरोप
शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हा आरोप केलाय. तसंच खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचं म्हटलं होतं, असा दावाच राज ठाकरे यांनी केलाय.
औरंगाबाद : शरद पवार (Sharad Pawar) यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरु झालं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील सभेत पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचं नाव घेत नव्हते. आता मी बोलल्यानंतर त्यांनी छत्रपतींचं नाव घेण्यास सुरुवात केलीय. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हा आरोप केलाय. तसंच खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचं म्हटलं होतं, असा दावाच राज ठाकरे यांनी केलाय.
सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या शरद पवार नास्तिक?
माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सर्वजण फडफडायला लागेल. पवार म्हणतात दोन समाजात हे दुही माजवत आहे. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. मी दुही माजवतोय? पवारसाहेब तुम्ही जाती जातीत जे भेद निर्माण करताय त्यातून भेद निर्माण होतोय. हातात पुस्तक घेऊन त्यावर लेखकाचं नाव बघून प्रतिक्रिया देतात. मी बोलल्यानंतर आता शिवाजी महाराजंचं नाव घेत आहेत. काही तरी व्हिडीओ काढताय, तल्लीन झालाय. गीतरामायण ऐकत आहेत. बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवत आहात. कशाला खोटं करतात. मी म्हटलं पवार नास्तिक आहे. नंतर देवाचे फोटो काढायला लागले. कशाला फोटो काढता. तुमची कन्या लोकसभेत म्हणाली माझे वडील नास्तिक आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केलाय.
राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा दाखला दिला
आजोबांची पुस्तक वाचा असं ते सांगत आहेत. मी वाचलीत, तुम्ही सर्व पुस्तकं वाचा. माझ्या आजोबांनी जे लिहिली आहे ते त्याकाळातील संदर्भाने होतं. व्यक्ती सापेक्ष होते. ते हिंदू धर्माची पुजा करायचे. माझे आजोबा भट भिक्षूकीवर टीका करणारे होते. धर्म मानणारे होते. प्रबोधनकारांचे पुस्तकं आणि काही संदर्भ मी पवार साहेबांसाठी लिहून आणले आहेत. माझी जीवनगाथा हे त्यांचं चरित्रं. 101 पानावर हिंदू धर्मासाठी केलेलं काम. ख्रिश्चन मिशनरीला विरोध केला. ते माझे आजोबा होते. महाराष्ट्रात नवरात्रोत्स साजरा करणारे माझे आजोबा होते, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
पुन्हा एकदा पवारांवर हल्लाबोल
उठ मराठ्या ऊठ या पुस्तकात प्रतापगडावरील संकट हे वाचा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वाचू नये. हे विष या माणसाने कालवलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष सुरू झाला. मराठा बांधव भगिनी यांची माथी भडकवायची. जेम्स लेन सारखा माणूस उभा करायचा त्याने काही लिहिल्यावर त्यावरून माथी भडकवायची. ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांच्या वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. कशासाठी तर ते ब्राह्मण म्हणून? आम्ही जात मानत नाही, जात बघितली नाही. त्याच्याशी घेणं देणं नाही. मी व्यक्ती बघतो. जात बघून पुस्तकंही वाचत नाही. रायगडावरील समाधी कुणी बांधली. ती लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पााहणार का. टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचं नाव काय मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.