मोदींनी स्वत:चा खड्डा खणलाय, आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील: राज ठाकरे
नाशिक: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली त्याचवेळी त्यांनी स्वत:साठी राजकीय खड्डा खणला होता. आता निवडणुका जवळ येतील तसं भाजप जास्तीत जास्त चुका करत जाईल. सध्या देशातील परिस्थिती अत्यंत घाणेरडी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन भाजप एकाचवेळी कुऱ्हाड आणि फावडं मारुन घेणार नाही. आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची दुर्दशा […]
नाशिक: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली त्याचवेळी त्यांनी स्वत:साठी राजकीय खड्डा खणला होता. आता निवडणुका जवळ येतील तसं भाजप जास्तीत जास्त चुका करत जाईल. सध्या देशातील परिस्थिती अत्यंत घाणेरडी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन भाजप एकाचवेळी कुऱ्हाड आणि फावडं मारुन घेणार नाही. आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची दुर्दशा होईल”, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पाच दिवस नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी दौऱ्याची सांगता पत्रकार परिषदेने केली. यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील सध्यस्थितीवर चौफेर टोलेबाजी केली.
गेल्या पाच दिवसांपासून मी नाशिकमध्ये आहे. आज या दौऱ्याची सांगता होत आहे. इथे मोठा प्रतिसाद मिळाला, पुन्हा जानेवारीत नाशिकमध्ये येईन, असं राज ठाकरे म्हणाले. इथे जमलेली गर्दी हेच सांगतेय की जनतेचा शिवसेना-भाजपवर विश्वास राहिला नाही. 5 राज्यांत भाजपची जी अवस्था झालीय, त्यापेक्षा वाईट अवस्था आगामी निवडणुकांमध्ये होईल, असं भविष्य राज ठाकरे यांनी वर्तवलं.
शरद पवार विमानात भेटले पण आघाडीच्या चर्चा विमानात होतात का? असा सवाल राज यांनी विचारला. ज्या सरकारला शिर्डी संस्थानकडून अनुदान घ्यावं लागतं, ते कशाच्या जोरावर अनुदान देतात? हे सरकार सर्व पातळ्यावर फेल ठरलंय, 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या म्हणता मग दुष्काळ का? जलसंधारणाचे पैसे कुठे गेले? हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यापेक्षा वाईट आहेत, असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवला.
देशातील वातावरण घाण
हनुमानाच्या जातीवरुन लोक उगीचच कशावरही वेळ घालवत आहेत. मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हा खेळ करत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. निवडणुका जवळ येतील तसं राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगली घडवतील हे मी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं. सध्या देशात तेच सुरु आहे. देशातील वातावरण अत्यंत घाण झालं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी देशातील सध्यस्थिती पाहता मुलं सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.
विरोधी जिंकत नाहीत, सत्ताधारी हरतात
जगभरातील निवडणुका पाहा, विरोधीपक्ष जिंकत नसतो तर सत्ताधारी हरत असतो, 5 राज्यातील निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा मोदींवरचा राग दिसून आला. मोदींना पर्याय विचारतात, मात्र पंडित नेहरुंना महात्मा गांधींनी पंतप्रधान बनवलं, नेहरु गेल्यानंतर लालबहाद्दूर शास्त्री आले, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई हे सर्व पंतप्रधान झाले हा लोकांचा निर्णय होता का? त्यामुळे पर्याय उपलब्ध होतात, असं राज ठाकरे म्हणाले.
काँग्रेसवरच्या रागामुळेच भाजपला सत्ता मिळाली, मोदींच्या जागी लालकृष्ण अडवाणी असते तर ते पंतप्रधान झाले असते, त्यामुळे त्या ठिकाणी कोण असतं ते महत्त्वाचं आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
मोदींइतका देश कुणीच खड्ड्यात घातला नाही
मोदींनी जेवढा देश खड्ड्यात घातला तेवढा कुणाला ठरवूनही खड्ड्यात घालता येणार नाही. अगदी मायावतींनाही, असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला.
लोकांचे कॉम्प्युटर तपासले तर त्यांना समजेल की मोदींना किती शिव्या पडतात, असं म्हणत राज यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन 10 एजन्सीना कोणाच्याही कॉम्प्युटरची चौकशी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यावरुन राज ठाकरे यांनी टीका केली.
भाजपच्या चुका वाढतील
निवडणुका जवळ येतील तसं भाजप जास्तीत जास्त चुका करत जाईल. हनुमानाचा मुद्दा असो वा रामाचा, ते अडकत जातील. मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ते असे मार्ग वापरत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
मोदींनी नोटाबंदी केली त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया होती मोदींनी स्वत:साठी राजकीय खड्डा खणला, त्यावेळी नोटाबंदीला विरोध करणारा देशातला मी पहिला माणूस होतो, असा दावा राज ठाकरेंनी केला.
लोकसभा-विधानसभा एकाचवेळी शक्य नाही, एकावेळी फावडं आणि कुऱ्हाड मारुन घेणार नाहीत. आधी फावडं मारुन घेतील मग कुऱ्हाड मारुन घेतील, असा टोमणा राज यांनी लगावला.
अमित ठाकरेंचं लग्न
अमितचं लग्न 27 जानेवारीला आहे, फार मोठ्या प्रमाणात लग्न होणार नाही. लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं हा प्रश्न आहे. सर्वांची यादी काढत बसलं तर 5-6 लाख लोक होतात, तुमच्या हौसेपोटी नवदाम्पत्याची ससेहोलपट नको, म्हणून लग्न छोटं करणार आहे. पण तरीही मुंबईतील गटनेत्यांची यादी काढली, लग्नाला बोलवायचं झालं तर त्यांची संख्या 11 हजार होते, पण तेवढेच येणार नाहीत. त्यांचे डागा, तेजा असतीलच ना. त्यामुळे हे सगळं प्रकरण हाताबाहेरचं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच बोलवू शकत नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
VIDEO: