राज ठाकरेंचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा, मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा!
राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केल्यानंतर, या महाअधिवेशनाची सुरुवात झाली.
मुंबई : मनसेच्या महाअधिवेशनाची सांगता राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) हे मनसैनिकांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी केंद्राच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. इतकंच नाही तर येत्या 9 फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार आहे. राज ठाकरे यांनीच याबाबतची घोषणा केली.
देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS Adhiveshan) यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केल्यानंतर, या महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड होत असल्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. त्यानंतर दिवसभर मनसेच्या विविध नेत्यांची भाषणं झाली.
राज ठाकरे यांचं भाषण लाईव्ह Raj Thackeray Live
झेंडा आवडला का? राज ठाकरेंचा मनसैनिकांना पहिलाच सवाल
राज ठाकरे यांनी झेंडा आवडला का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. ते म्हणाले, येत्या 9 मार्चला पक्षाला 24 वर्षे होतील. आम्ही सर्व काही दिवसांपासून विचार करत होतो की पक्षाचं एक अधिवेशन घेणं गरजेचं आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सर्व एकत्र येतातच. मात्र, अधिवेशन होतं तेव्हा राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात वेळ घालवतात. तसंही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे.
सर्वच जण उत्तम बोलतात. आपल्यापैकीही अनेकजण उत्तम बोलतात. तुम्ही लोकांनी अधिवेशनासाठी खूप मेहनत घेतली. 9 मार्चला वर्धापनदिन आणि 25 मार्चला आपली गुढी पाडव्याची सभा आहे. मला जे काही अनेक विषय बोलायचे आहेत ते विषय सुरु करण्याआधी मी दोन तीन संघटनात्मक गोष्टी सांगणार आहे. हे सांगितल्यावर मला तसं पक्षात होताना दिसता कामा नये.
पहिला भाग – सोशल मीडिया – फेसबूक, ट्विटर आणि सर्व गोष्टी – काही महाराष्ट्र सैनिक काही संबंध नाही, पण डावा आहे, उजवा आहे काही प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला संघटनात्मक कोणतीही गोष्ट वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. तुम्हाला कुणाबद्दल जर काही भावना व्यक्त करायची असेल तर आम्ही आहोत आम्हाला सांगा.
मात्र, पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर चालणार नाही. असं आढळलं तर मी त्या व्यक्तीला पदावरुन दूर करेल. शहराध्यक्ष असो किंवा तालुक्याध्यक्ष अथवा शाखाध्यक्ष असतात. त्यांचं वय सारख असतं, मात्र, पद नावाची एक गोष्ट असते. त्यामुळे पदाचा सन्मान झाला पाहिजे. जे उत्तम काम करता ते लिहा , ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे.
या सर्व गोष्टींसाठी पत्रकारांनी खूप मदत केली, यापुढेही करतील. मी मध्यंतरी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की यशाला बाप खूप असतात. यश मिळालं की मी केलं मी केलं सांगतात. त्यात मी नवं वाक्य शोधलं, अपयशाला अनेक सल्लागार असतात.
संघटनात्मक बांधणीसाठी आपण एक सेल सुरु करतो आहे. आत्ता दोन व्यक्तींची निवड होईल. उद्या त्यांच्याखाली तुमच्यापैकी अनेक लोक असतील. संघटनेचं काम करणाऱ्यांनी रायगड येथे कार्यालयात येऊन नाव नोंदवावं आणि पक्षासाठी काम करायचं आहे, निवडणूक लढवायची नाही असं सांगावं. बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके माझ्याशी बोलून संघटनात्मक काम मजबूत करण्यासाठी ते काम करतील. ते जे काम करणार नाही त्यांचंही नाव माझ्यापर्यंत येईल.
तिसरा मुद्दा – शॅडोव कॅबिनेट – पक्षाचे सरचिटणीस आणि त्यांच्या खालील टीम सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या खात्याच्या कामावर देखरेख ठेवतील. या खात्यांचा संपूर्ण राज्यावर परिणाम होत असतो. अगदी आपल्या पक्षाचं सरकार आलं तरी ते लक्ष ठेवतील.
पक्षाचा झेंडा का बदला?
मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो हा झेंडा होता. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितलं होतं, तेव्हा माझे आजोबा हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलं होतं. तो जो झेंडा होता तो संयुक्त महाराष्ट्र समितीने देखील वापरला होता. त्यानंतर ही समिती विखुरली आणि शिवसेना तयार झाली. पुढे जे काही घडलं ते बाळासाहेब ठाकरेंमुळे घडलं. हे सर्व करण्यासाठी जे करावं लागतं त्यासाठी माणसं असावे लागतात मी एकटा होतो. त्यामुळे तेव्हा मनसे स्थापन करताना मागे कोणी नव्हतं सांगायला कोणी नव्हतं. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलं. हा रंग घ्या तो घ्या, सोशल इंजिनिअरींग करणं म्हणतात त्याला.
तेव्हापासून माझ्या डोक्यात हा झेंडा होता. अनेकांना वाटतात आत्ताच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा आणला. मात्र हा केवळ योगायोग आहे. हा मुळ डीएनए आहे. तो झेंडा आणायचाच होता. मात्र, कसा आणायचा हा विचार करताना पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणण्याचं ठरवलं.
एक गोष्ट सांगतो ही महाराजांची राजमुद्रा आहे. दुसरा कोणता झेंडा नाही. तो जेव्हा हातात घ्याल, तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसायला नको. आपले दोन झेंडे आहेत. निवडणुकीच्यावेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान राखलाच पाहिजे. त्याचा कुठेही गोंधळ व्हायला नको. झेंडे बदलले आहेत. मनसे पहिल्यांदा करते आहे असं नाही. जनसंघाने झेंडा आणि नाव बदलूून भाजप केलं. त्याआधीचंही उदाहरण आहे. मराठीत आपण बोलतो कात टाकावी लागते, नवी उर्जा द्यावी लागते. कोणत्याही सकारात्मक गोष्टीसाठी बदल आवश्यक असतो.
मग मराठीचं काय होणार? मी एक गोष्ट आजच सांगून ठेवतो. परंतू मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मातरण केलेलं नाही. मी आज बोलत नाही. माझे 14 वर्षांतील भाषणं काढून पाहा. माझ्या मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि माझ्या धर्माला नख लावलं तर हिंदू म्हणून अंगावर जाईल.
येथे सकाळी जरी गोंधळ झाला असला तरी मी स्पष्ट आहे. मी मागील काही दिवसांपासून वाचतो आहे. जे देशाशी प्रामाणिक आहेत ते मुस्लीम आमचेच आहे. आम्ही एपीजे अब्दूल कलाम, जहीर खान, जावेद अख्तर यांच्यासारख्या लोकांना विसरू शकत नाही. ते आमचेच आहे.
जावेद अख्तर यांची मुलाखत पाहिली त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. उर्दू भाषा ही कधीच मुस्लीमांची भाषा नव्हती. म्हणूनच बांग्लादेशाने भाषेच्या मुद्द्यावर वेगळा देशा मागितला. भाषा कोणत्याही धर्माची नसते.
हे मला सरसकट मान्य नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीच्या लोकांनी पोलीस भगिणींवर हात टाकला तेव्हा या राज ठाकरे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
नमाज का त्रास देतोय?
भारतात कलाकार राहिले नव्हते असं समजत पाकिस्तानी कलाकारांना भारतात आणलं तेव्हा त्यांन हाकलणारे मनसेचे कार्यकर्ते होते. तेव्हा कुणी नाही म्हणालं की हिंदूत्वाकडे जात आहात. धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?
नमाज का पढता असं आम्ही म्हणत नाही. भोंगा लावून का नमाज करतात? किती बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावा असं अनेक वर्षांपासून सांगतो आहे. तेव्हा कुणी नाही म्हणालं, हिंदुत्वाकडे जात आहात?
समझोता एक्स्प्रेस बंद करा
आम्हाला आमचा मार्ग माहिती आहे. भारत काय धर्मशाळा नाही. कुणीही येथे यावं आणि येथे राहावं. अडीच हजार रुपये दिले तर भारतात येता येतं. पाकिस्तानचे नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्र सरकारला सांगणं आहे. तुम्ही पहिल्यांदा समझोता एक्स्प्रेस बंद करा.
.. तर सैन्याला बाहेर लढण्याची गरज नाही
आपल्याला यांच्याशी संबंध का ठेवायचे आहेत. माझ्या अनेक क्लिप्स लोकं काढतात आणि फिरवतात. मी तेव्हा सांगितलं होतं की उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर लढण्याची गरज राहणार नाही, आतच लढावं लागेल. मला लोक विचारतात तुम्ही मोदींवर टीका केली. मी माणूसघाण नाही. जिथं चूक वाटलं तिथं टीका केली. जिथं चांगलं वाटलं तिथं कौतुक केलं.
पोलिसांना 48 तास द्या
काश्मीर, राम मंदिर विषयावर मी कौतुक केलं. मात्र, आज ज्या गोष्टी होत आहेत. जे बाहेरुन आले आहेत त्यांना का पोसायचं? या लोकांची आपल्या पोलिसांकडे आहे. माझा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर इतका विश्वास आहे, की त्यांना एकदा 48 तासांचा वेळ द्या बघा ते काय करुन ठेवतात.
मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो
अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लीम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मीर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आत्ता बाहेर येत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील तर आम्ही त्यांना का साथ द्यावी. अनेक जण म्हणतात राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.
जे योग्य त्याचं अभिनंदन , जे चुकीचं आहे त्यावर बोलणारच. आज अमेरिका युरोपमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या असतात ते बाहेरच्या लोकांना पासपोर्ट विचारतात. मात्र, त्या देशातील यंत्रणा त्या लोकांना विचारणा करते.
ज्याच्याकडे अमेरिकन, ब्रिटीश पासपोर्ट असतो ज्यांना जगात कोणत्याही देशात जायला व्हिजा लागत नाही, मात्र, भारतात विजा लागतो. ज्या देशात सगळीकडून लोकं येतात त्या भारतात अमेरिका आणि ब्रिटीश लोकांना विजा मागून कशासाठी विचारतात.
मात्र, देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे.
माझ्याकडे काही माहिती आली आहे. महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात, तेथे पोलिसांनी जायलाही परवानगी नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की हे मोठं कारस्थान घडवण्याचं काम सुरु आहे. ही माहिती मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून देणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहावं, हे मी त्यांना भेटून सांगणार आहे.
मागे जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्या सर्व 25 मार्चला टराटरा फाडणार आहे. पण आत्ता अनेक मोर्चे निघत आहेत, त्या मोर्चांना उत्तर जाणं गरजेचं आहे. मोर्चाला उत्तर मोर्चानं, म्हणून 9 तारखेला आझाद मैदानावर मनसे मोर्चा काढेल, त्या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.