वडा टाकला की तळून निघाला पाहिजे.. ही मानसिकता सोडा, भाजप-शिवसेनेचा इतिहास पाहा, राज ठाकरेंचा उपदेश काय?
आजच्या राजकारणात तरुणांनी मेहनतीची, संघर्षाची मानसिकता जोपासली पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
नागपूरः आजकालच्या पिढीला सगळं तत्काळ हवंय. वडा टाकला की तळून निघाला पाहिजे, हे नेमकं काय आहे? राजकारणात संघर्ष आणि पराभवाशिवाय यश दिसत नाही, अशा शब्दात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांना उपदेश दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहेत. मनसे कार्यकर्त्यांसाठी त्यांनी प्रोत्साहनपर भाषण केलं. मनसेला निवडणुकांमध्ये वारंवार पराभवाला सामोरं जावं लागतं, अशी चर्चा असते. या चर्चांकडे जास्त लक्ष देऊ नका, कार्य करत रहा असाच संदेश राज ठाकरे यांनी दिला.
राजकारणात आजच्या घडीला सर्वात मोठे समजले जाणारे भाजपा आणि काँग्रेस हे दोन पक्ष कधी जन्माला आले आणि त्यांना कधी यश आलं, यात केवढी वर्षे लोटली, कित्येक पिढ्या गेल्या, याचा दाखला राज ठाकरे यांनी दिला.
कार्यकर्त्यांसमोर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ पराभव कुणाचा होत नाही? अनेक दिग्गजांचे पराभव झाले आहेत. 1025साली रास्वसंघाची स्थापना झाली. 1952 मध्ये जनसंघ स्थापन झाला. तेव्हा त्यांचे किरकोळ प्रमाणात लोक निवडून येत असतं.
1996 ला अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 13दिवसांसाठी. मग पुन्हा 1998 साली पंतप्रधान झाले आणि 1999 साली. या तिन्ही वेळेला त्यांना बहुमत नव्हतं…
पण खऱ्या अर्थाने 2014 साली भाजपला बहुमत मिळालं. 1952 ते 2014 कितीही मतभेद असले तरी काम करण्याच्या सातत्यातून 2014 मध्ये हे यश मिळालं…
भाजपप्रमाणेच शिवसेनेचा इतिहासही ठाकरेंनी उलगडून सांगितला. ते म्हणाले, काँग्रेसचाही संघर्ष कमी नाहीये. 1966 मध्ये माझ्या काकांनी शिवसेना जन्माला घातली. एखादाच निवडून यायचा. 1985 साली छगन भुजबळ एकटे निवडून आले होते. खऱ्या अर्थाने खासदार आमदार आले ते 1990 ला. तर 1995 ला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सत्ता आली. हा मेहनतीचा काळ होता, पण आजच्या राजकारणात तरुणांनी मेहनतीची, संघर्षाची मानसिकता जोपासली पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.