Raj Thackeray : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीला जामीन, भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट राज ठाकरेंना इशारा!
'हमको छेडेंगे तो छोडेंगे नहीं' असं म्हणत पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या अब्दुल मतीन शेखानी यांनी राज ठाकरेंना इशारा दिला होता. या मतीन शेखानी यांना अखेर ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय.
मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशावेळी ‘हमको छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ असं म्हणत पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (Popular Front Of India) अर्थात पीएफआयच्या अब्दुल मतीन शेखानी यांनी राज ठाकरेंना इशारा दिला होता. या मतीन शेखानी यांना अखेर ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंब्रामध्ये एका सभेत बोलताना अब्दुल मतीश शेखानी (Abdul Matin Shekhani) यांनी जाहीरपणे मनसेला इशारा दिला होता. त्यावेळी विना परवानगी गर्दी जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून मतीन शेखानी हे फरार होते. त्यानंतर आज ठाणे न्यायलयात झालेल्या सुनावणीत शेखानी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर शेखानी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.
मतीन यांचा मनसेला नेमका इशारा काय?
काही लोक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. काही लोकांना अजानची अडचण होतेय. काही लोकांना भोंग्यांची अडचण होतेय. काही लोकांना आपल्या मस्जिद आणि मदरशांची अडचण होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की हर मजदूर हमारा है. सोबतच आमचा दुसराही नारा आहे की, ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’. येवढं लक्षात ठेवा की, एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पीकरवर तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल, अशा शब्दात पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी इशारा दिलाय.
राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेत. अशावेळी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :