मिशन विदर्भानंतर राज ठाकरेंचं आता ‘मिशन कोकण’; 7 ऑक्टोबरपासून दौऱ्याला सुरुवात
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भ दौरा केला होता. विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भ (Vidarbha) दौरा केला होता. विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे हे कोकण (Konkan) दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या सात ऑक्टोबरपासून राज ठाकरे यांच्या ‘मिशन कोकणला’ सुरुवात होणार आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळकोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सौनिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
असे असेल राज ठाकरे यांचे ‘मिशन कोकण’
मनसे प्रमुख राज ठाकरे हे येत्या 7 ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर आहेत. ते कोल्हापूर मार्गे तळकोकणात दाखल होतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात त्यांचा प्रत्येकी दोन दिवस दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे हे मनसे कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्याची देखील शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा माणण्यात येत आहे. विदर्भाप्रमाणेच राज ठाकरे आपल्या कोकण दौऱ्यात देखील पक्षाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.
राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर विदर्भवादी नेते आक्रमक
दरम्यान दुसरीकडे मनसेने वेगळ्या विदर्भाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून विदर्भवादी नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भवादी नेत्यांकडून राज ठाकरेंवर घणाघातील टीका करण्यात आली आहे. तर मनसेने देखील या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.