“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल” राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात तात्काळ सूट देण्याची मागणी केली आहे. “राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. (Raj Thackeray writes to CM Uddhav Thackeray to stop the issuing of unreasonable and exorbitant electricity bills)
काय आहे राज ठाकरे यांचे पत्र?
“कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.”
“खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे.” असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
“तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली तीन महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्या सवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे.” असेही राज यांनी लिहिले आहे.
हेही वाचा : वीज ग्राहकांनी 50 टक्केच बिल भरावे, ‘बेस्ट’ पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मनसेचे आवाहन
“कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण ह्या अशा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये.” असा इशारा त्यांनी दिला.
“राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच ह्या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसंच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल.” असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“विषय संवेदनशील आहे आणि सरकार देखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल ह्याची मला खात्री आहे.” असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. #वीजआकारणी #महावितरण #टाळेबंदी #कोरोनामहासाथ #MahaVitaran #electricitybill #Lockdown #CoronaCrisis@CMOMaharashtra pic.twitter.com/IFnxkBOZLw
— Raj Thackeray (@RajThackeray) July 28, 2020
(Raj Thackeray writes to CM Uddhav Thackeray to stop the issuing of unreasonable and exorbitant electricity bills)