पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थीवर धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यालाही तीव्र विरोध केलाय. मशिदीवरील भोंगे सरकारला काढावेच लागतील. नाहीतर त्या भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमानचालिसा लावा असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलाय. राज यांच्या या भूमिकेचे पडसाद आज काही ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान, राज यांच्या या भूमिकेमुळे मनसेतील काही नेते नाराज असल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर राज यांच्या या आदेशानंतर पुण्यात मनसेतील पहिला राजीनामाही पडलाय!
राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळं नाराज आहे. आम्हाला जमिनीवर काम करावं लागत अशल्यामुळे लोकांना उत्तरं द्यावी लागतात. साहेब ब्ल्यू प्रिंट आणणार म्हणून मी मनसेत प्रवेश केला होता. मी माझा राजीनामा पाठवला असून, तो अद्याप स्वीकारला गेला नाही. अजून काही मुस्लिम पदाधिकारीही राजीनामा देणार आहे. मात्र, मी त्यांची नावं सांगणार नसल्याचं पुण्यातील मनसे पदाधिकारी माजिद शेख यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंच्या या आदेशामुळे आता पुण्यातील मनसे नेत्यांची गोची होत असल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर नाराज असल्याची माहिती मिळतेय. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्यामुळे या दोघांची मोठी अडचण होणार असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत बोलण्यास मात्र या दोघांनी नकार दिलाय. या पार्श्वभूमीवर मनसेची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे यांच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असं युरोपातील शासन आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :