दुसऱ्या पक्षांच्या भांडणात उडी मारण्याची गरज नाही; राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर वैतागले
दुसऱ्यांच्या भांडणात उडी मारण्याची गरज नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील वादावर प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मुंबई : दुसऱ्या पक्षांच्या भांडणात आपल्याला उडी मारण्याची गरज नाही असं सांगत राज ठाकरेंनी आपल्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. निवडणूक आयोगानं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत. काल निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना हे नाव आता शिल्लकसेना प्रमुखांना वापरता येणार नाही. तर, धनुष्यबाण हे चिन्हसुद्धा निवडणूक आयोगानं गोठवले आहे. आता शिल्लकसेना प्रमुखांकडे राष्ट्रवादीचं घड्याळ, आबू आझमीची सायकल आणि माफ करा एमआयएमचा पतंग हे एवढेच आधार आणि पर्याय शिल्लक आहे.
शिल्लकसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी संपलेला पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधीकाळी हिणवलं. आज त्यांचा पक्ष आणि चिन्ह इतिहासजमा होण्याची वेळ आलीय…काळाचा महिमा बघा..जैसी करणी..वैसी भरणी असं म्हणत गजानन काळे यांनी टीका केली होती.
मनसेचे दुसरे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला..जे वारंवार लोकांशी शपथ घेऊन खोटं बोललात .त्यामुळं देवबाप्पानं केलेली ही शिक्षा आहे. त्यामुळं तुम्हाला आता ती सहानभूती मिळणार नाही. ती मिळवायचा प्रयत्न करु नका. मराठी माणूस ती तुम्हाला देणार नाही.
काल निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केलं. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने. सत्यमेव जयते असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केले.
पण ट्विट करताना त्यांची स्पेलिंग मिस्टेक झाली. लिहिताना शिवसेना ऐवजी शिवेसना अशी चूक झाली. मनसे नेते अमेय खोपकर यांनी यावरुनही आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत ट्विट केले.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार युवराज आदित्य ठाकरे यांची अंमलबजावणी, तात्काळ काही वेळातच थेट युवराजांनी बदलले पक्षाचे नाव असं ट्विट खोपकर यांनी केला.
वाद होता ठाकरे आणि शिंदे गटातला. पण, यात मनसे नेत्यांनी यात उडी घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यामुळं राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय.
दुसऱ्यांच्या भांडणात उडी मारण्याची गरज नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील वादावर प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.