‘शिवसेनेसोबत जाण्याविषयी कुणीही संपर्क केला नाही, आमचा निर्णय बहुमताच्या वेळी घेऊ’
शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on Shivsena Congress NCP alliance) शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेविषयी महाआघाडीतील कुणीही संपर्क केला नसल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली: शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on Shivsena Congress NCP alliance) शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेविषयी महाआघाडीतील कुणीही संपर्क केला नसल्याचं म्हटलं आहे. तसंच स्वाभिमानी पक्ष बहुमताच्यावेळी आपला निर्णय घेईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजू शेट्टी यांच्या वक्तव्यांमधून ते काहीसे नाराज असल्याचंही दिसून आलं. यावेळी त्यांनी (Raju Shetti on Shivsena Congress NCP alliance) तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम काय आहे, त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे की नाही हे पाहूनच पुढील निर्णय घेणार असल्याचं नमूद केलं.
राजू शेट्टी म्हणाले, “भाजप-शिवसेनाविरोधात तयार करण्यात आलेल्या आघाडीचा आम्ही भाग होतो. मात्र, महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नव्या समिकरणांविषयी आमच्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. आम्ही देखील कुणाशी संपर्क केला नाही. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. आम्ही त्यातच गुंतून पडलो होतो. त्यामुळे आम्ही कुणाशी संपर्क साधला नाही. मात्र, भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी जे करायला हवे ते करावे. आमचीही तिच भूमिका आहे.”
आता आघाडीत काही नवे पक्ष येणार असतील, तर त्याविषयी आमचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे त्याविषयी आमची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला विचारलंच नाही, तर सांगायचं कारण काय? असाही प्रश्न राजू शेट्टींनी उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली.
राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर देत तात्काळ त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “सरकार कुणाचंही येवो. सत्ता स्थापन करणाऱ्यांनी शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज संपवलं पाहिजे. आज जे पक्ष सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तात्काळ सरकार स्थापन करुन शेतकऱ्यांचं कर्ज संपवावं. त्यांनीही निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आघाडीचा किमान समान कार्यक्रम बघूनच त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवलं जाईन.”