कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कंगना रनौतवर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप करत हल्ला चढवला आहे (Raju Shetti criticize Kangana Ranaut on Farmer issue).
इचलकरंजी : शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. (Raju Shetti criticize Kangana Ranaut on Farmer issue) “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कंगनावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौत सारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही,” असं शेट्टी म्हणाले.
VIDEO: कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी #RajuShetti #KanganaRanaut #AgriBill@rajushetti pic.twitter.com/WoA4Kn2kAJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2020
कंगना रनौत काय म्हणाली होती?
प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है! मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020
“हिमाचल प्रदेश सारख्या उंच टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतकऱ्यांवर बोलणं हा मोठा विनोद”
“शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेश सारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सूचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांचे पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील. हा दिवस फार लांब नाही,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
“शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय तर शेतकरी विरोधात का?”
“देशभरातील 260 पेक्षा अधिक संघटनांना एकत्र करून आम्ही अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षांपासून या झेंड्याखाली आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्रितरित्या काम करतोय. यातून देशपातळीवर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून एक दबाव गट तयार करत आहोत. यातूनच संपूर्ण देशभरातील शेतकरी सरकारच्या विरोधात उभा राहिला आहे. त्यांना केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या बळावर मंजूर केलेले कायदे मान्य नाहीत,” असंही त्यांनी सांगितलं.
“एका बाजूला पंतप्रधान म्हणतात हा ऐतिहासिक दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मग शेतकरी या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर न उतरता विरोध करण्यासाठी का येत आहे? याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे. पण ते उत्तर देणार नाहीत. कारण हे कायदे फक्त दलाल, कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्याचे आहेत आणि शेतकऱ्याला शेतीतून बेदखल करण्यासाठीच केलेले आहेत. या भाडोत्री दलालांना शेतकरी एक ना एक दिवस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा
Raju Shetti criticize Kangana Ranaut on Farmer issue