राजू शेट्टी दुसऱ्यांदा ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणतात….
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
मुंबई : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच राजू शेट्टी पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात नवी समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“राज ठाकरे यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसचासुद्धा विरोध मावळेल अशी आशा आहे”, असं राजू शेट्टी यांनी या भेटीनंतर सांगितलं.
यापूर्वीची भेट
यापूर्वी राजू शेट्टींनी राज ठाकरे यांची 28 मे रोजी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या भेटीगाठी सुरु केल्या . 28 मे रोजी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि राजू शेट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा केला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विधानसभेसाठी बोलणी झाल्याचेही बोलले गेले. मात्र, यानंतरही लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचाराला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, अशी टीका झाली. त्यामुळे आता राज ठाकरे देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपली रणनीती ठरवत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काय चर्चा केली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या