मी आव्हान दिल्यानं चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्याला गेले: राजू शेट्टी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Kothrud) यांना मी आव्हान दिल्यामुळेच ते कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढवत असल्याचा टोला माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti Challenge Chandrakant Patil) यांनी लगावला आहे.
सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Kothrud) यांना मी आव्हान दिल्यामुळेच ते कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढवत असल्याचा टोला माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti Challenge Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. यावेळी ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील ग्रामीण मतदारसंघातून लढणार असतील त्यांच्याविरोधात लढण्याची घोषणा मी केली होती. त्यामुळेच चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढवत आहेत.”
यावेळी राजू शेट्टी यांना तुम्ही कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांविरोधात लढणार का असंही विचारण्यात आलं. त्यावर शेट्टी म्हणाले, “मला पुण्याहून लढण्यासाठी देखील मागणी होत आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या दारात लढाई न करता आपल्या दारात करण्याची शिकवण दिली आहे.”
चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला कोठरुडमधून विरोध होतो आहे. म्हणूनच पुण्यातील ब्राम्हण महासंघाने पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी मला निमंत्रण दिलं आहे. पण मी हे निमंत्रण स्वीकारले नाही, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं.
दरम्यान, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही. भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही, तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.
विद्यमान आमदारही नाराज
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर कोथरुडच्या विद्यमान भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मेधा कुलकर्णी स्वतः कार्यकर्त्यांसह मुंबईला येऊन त्यांची बाजू मांडणार असल्याचंही बोललं जात आहे.
या विरोधावर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील. कोथरूड जितकं मला माहित आहे, तितकं कोणालाच माहीत नाही. मला कोथरूडकर बाहेरचा म्हणणार नाहीत. युतीचा फॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही. युती झाली हे पुरेसं आहे.