‘सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतात, मग राजू शेट्टी-बच्चू कडूंनीही एकत्र यावं’
जालना: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकत्र यावे, अशी इच्छा दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे यांनी दिली. रोजच्या भेटीघाटीत स्वाभिमानी आणि प्रहार संघटनेत तशी चर्चादेखील सुरु […]
जालना: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकत्र यावे, अशी इच्छा दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे यांनी दिली.
रोजच्या भेटीघाटीत स्वाभिमानी आणि प्रहार संघटनेत तशी चर्चादेखील सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन लढायला हवं, हे दोघेही एकत्र येतील असा विश्वास यावेळी चिन्नदोरे यांनी व्यक्त केला. सर्व पक्षाचे लोक राष्ट्रवादी- काँग्रेस, शिवसेना – भाजप एकत्र येतात. त्यामुळे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनीही एक विचाराने एकत्र येऊन युती करायला हवी, असं चिन्नदोरे म्हणाले.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामांन्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू नेहमी पुढे असतात. भ्रष्टाचाराविरुद्धही दोघेही आक्रमकतेने भूमिका घेतात, या दोन्ही नेत्यांचा अजेंडा एकच असल्यामुळे आगामी निवडणुका एकत्र येऊनच लढल्या पाहिजे, अशी इच्छा दोन्ही संघटनेच्या तमाम कार्यकर्त्यांची असल्याचं साईंनाथ चिन्नदोरे यांनी सांगितलं.
संघटनात्मक दृष्टीनेही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे राज्यभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या दोन्ही संघटना एकत्र आल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभाव पाडू शकतील, असा विश्वास चिन्नदोरे यांनी व्यक्त केला.