स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीची साथ सोडणार? लवकरच निर्णय घेणार, राजू शेट्टींचं मोठं विधान
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीका केलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचं मोठं वक्तव्यंही शेट्टी यांनी ऊस परिषदेत केलंय.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीका केलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचं मोठं वक्तव्यंही शेट्टी यांनी ऊस परिषदेत केलंय. शेट्टींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raju Shetty to leave Mahavikas front? Shetty’s big statement at the sugarcane conference in Kolhapur)
‘महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होतोय’
महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय, असंही शेट्टी यावेळी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकरी लांब गेले तर राष्ट्रवादीचं काय होईल याचा विचार करा. महाविकास आघाडीनं घरगुती वीज ग्राहकांना फसवलं, पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं. सरकारमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, याचा निर्णय लवकरच घेऊ. आता कुणाला भेटायला जायची गरज नाही, असा इशाराच शेट्टी यांनी पवारांना दिलाय.
त्यावेळी ईडी येडी झाली होती, शेट्टींचा टोला
किरीट सोमय्या करत असलेले आरोप आणि तक्रार मी सहा वर्षांपूर्वीच ईडीकडे केली होती. मात्र, त्यावेळी ईडी येडी झाली होती. आता शहाणी झाली. याचा केंद्राला फायदा होईल हे आता ईडीला कळलं आहे. आता सुरु असलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करु, पण हे सगळे कारखाने शेतकऱ्यांच्या ताब्यात जातील हे जाहीर करा, असं आव्हान शेट्टी यांनी दिलंय. गेल्या हंगामाची एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका. दिला तर तो कारखाना आम्ही बंद पाडू, असा इशाराही शेट्टींनी यावेळी दिलाय.
‘पैसे नाही म्हणालात आणि 11 टक्के महागाई भत्ता दिला’
गेली 19 वर्षे याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपण आणलं. पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं. यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलंच असेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं संकट आलं. पैसे नाही म्हणालात आणि 11 टक्के महागाई भत्ता दिला, असा घणाघात शेट्टी यांनी केलाय.
दिवाळीला नेते, मंत्र्यांना काळे झेंडे दाखवा
दरसा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करु असं मी सांगितलं होतं. आता दिवाळीला गावात येणाऱ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा. यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. शरद पवारांना फक्त पावसातील भाषणाची आठवण करुन देतो. साखरेला चांगले भाव आले असताना एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे, असा आरोप शेट्टी यांनी केलाय.
‘भाजपनं कृषी मूल्य आयोगाची वाट लावली’
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी फडणवीसांना एक पत्र लिहिलं. ते पत्र काही ऐतिहासिक नाही किंवा अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तराला लिहिलेलं पत्र नाही. त्याऐवजी केद्रातील सचिवांनी याबाबत एक पत्र किंवा प्रेसनोट काढायला हवी होती. आज दिल्लीत काही मंडळी गेली आहे. ते म्हणतात आम्ही साखर कारखानदारांचे प्रश्न सोडवणार. तुम्ही त्यांचेच प्रश्न सोडवा, त्यांनाच कमी पडलं आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. स्वामिनाथन आयोग लागू करतो म्हणून सत्तेवर आलेल्या भाजपनं कृषी मूल्य आयोगाची वाट लावली. भाडोत्री आणि विकाऊ लोक दिल्लीत बसले तर शेतकऱ्यांची वाट लागायला वेळ लागत नाही, असा घणाघातही शेट्टी यांनी केलाय.
राजू शेट्टींची पवारांना ‘त्या’ सहीची आठवण
शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसला बळ दिलं ते शेतकऱ्यांनी. पण ज्यावेळी आमचा प्रश्न आला तेव्हा पवारसाहेब तुम्ही कारखानदारांची बाजू घेतली. ईडी मागे लागेल म्हणून काहीजण पळून गेले तेव्हा शेतकरी तुमच्या मागे राहिला. आता पुन्हा कारवाई सुरु झाली तर माहिती नाही आहेत तेही पळून जातील, असा टोलाही शेट्टींनी लगावलाय. एकरकमी एफआरपी दिली तर साखर कारखानदारीची अवस्था मुंबईतील गिरणीसारखी होईल असं पवारसाहेब म्हणतात. पण एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर मंत्री असताना तुम्हीच सह्या केल्या होत्या, अशी आठवणही शेट्टी यांनी पवारांना करुन दिली. अंबालिका साखर कारनाना एकरकमी एफआरपी देणार म्हणाला. महाराष्ट्राने काकावर विश्वास ठेवावा की पुतण्यावर? असा खोचक सवालही शेट्टी यांनी यावेळी केलाय.
इतर बातम्या :
ठाकरे सरकार भेदभाव करतं? शाहसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस, दानवेंचा दिल्लीतून थेट आरोप
सहकाराच्या मुद्द्यावर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक सकारात्मक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Raju Shetty to leave Mahavikas front? Shetty’s big statement at the sugarcane conference in Kolhapur