राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब, त्यांनी संविधानाला पाठ दाखविली, अध्यक्षांचा विरोधकांवर निशाणा
पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि नंतर सभात्याग केला. विरोधकांच्या या कृतीवर अध्यक्ष यांनी प्रश्न उपस्थित केले. हे अत्यंत क्लेशदायक, वेदनादायक आणि असभ्य वर्तन आहे. विरोधकांनी आज सभागृह नाही तर प्रतिष्ठा सोडली आहे असे अध्यक्ष म्हणाले.
राज्यसभेमध्ये राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, पंतप्रधान मोदी आपले म्हणणे मांडत असताना विरोधकांनी मोठी घोषणाबाजी केली. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पंतप्रधान मोदींचे भाषण थांबवून आपले म्हणणे मांडावे लागल्याची परिस्थितीकडे लक्ष वेधले. विरोधकांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित करताना हे अत्यंत क्लेशदायक, वेदनादायक आणि असभ्य वर्तन आहे. विरोधकांनी आज सभागृह सोडले नसून प्रतिष्ठा सोडली आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
त्यांनी भारतीय राज्यघटनेकडे पाठ फिरवली
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, हे अत्यंत वेदनादायक आणि असभ्य वर्तन पाहून मन दुखावले आहे. सरकार सातत्याने काम करत आहे. मी चर्चा केली आणि विनंती केली. विरोधी पक्षनेत्यांना कोणतेही बंधन न ठेवता बोलण्याची संधी देण्यात आली. पण, आज त्यांनी सदन नाही तर प्रतिष्ठा सोडली आहे. त्यांनी आज केवळ माझ्याकडेच पाठ फिरवली नाही तर भारतीय राज्यघटनेकडेही पाठ फिरवली आहे असे ते म्हणाले.
संविधान हे जिंकायचे पुस्तक…
संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षांनी काही विरोधी खासदारांवर संविधान हातात घेऊन फिरत असल्याबद्दल निशाणा साधला. विरोधकांनी आज माझा अनादर केला नाही. तुमचा अनादर केला नाही. संविधानाखाली घेतलेल्या शपथेचा अनादर केला आहे. भारतीय राज्यघटनेचा एवढा मोठा अनादर, एवढा मोठा विनोद? भारतीय संविधान हे हातात ठेवायचे पुस्तक नाही तर ते जगण्यासाठीचे पुस्तक आहे. मला आशा आहे की ते आत्मपरीक्षण करतील. विचारमंथन करतील आणि पुन्हा कर्तव्यावर येतील असे अध्यक्ष म्हणाले.
राज्यसभेतून विरोधकांच्या सभात्यागावर पंतप्रधान मोदी यांनीही प्रश्न उपस्थित केले. विरोधक वरिष्ठ सभागृहाच्या महान परंपरेचा अपमान करत आहेत. देशातील जनतेने त्यांचा इतका पराभव केला. आता त्यांच्याकडे रस्त्यावर ओरडण्याशिवाय पर्याय नाही. घोषणाबाजी, जल्लोष, हेच त्यांच्या नशिबात लिहिले आहे अशी टीका करत मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.