मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. अखेर 7 तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आव्हाड आणि ठाकूर यांचं मत ग्राह्य धरण्यात आलं आहे. मात्र, सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं आहे. अशावेळी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. गरज भासली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.
‘मी माहिती घेतो त्याबाबत आणि अधिकृतपणे.. मला वाटत नाही की सुहास कांदेचं मत बाद झालं असेल. याबाबत मी माहिती घेतो. लोकशाहीत अशाप्रकारे मत बाद करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर शेवटी आम्हाला न्यायदेवता आहे, न्यायालय आहे. परंतु मी माहिती घेतल्यावरच याबाबत अधिकृतपणे बोलेल. मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढं संख्याबळ लागतं त्यापेक्षा अधिक संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्या आमदारांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं आहेच. पण अपक्ष आणि सहयोगी पक्षांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील’, असा दावा शिंदे यांनी केलाय.
Maharashtra | Election Commission passes detailed order after analysing the report of RO/ Observer/Special Observer and viewing the video footage, directs the RO to reject the vote cast by MLA Suhas Kande and permits the counting of votes to commence#RajyaSabhaPolls
— ANI (@ANI) June 10, 2022
दरम्यान, माझं मत बाद झालं याबाबत कायदेशीर पुरावा माझ्याकडे आलेला नाही. माझ्याकडे ते आलं तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कायदेतज्ज्ञांना दाखवून पुढचा निर्णय घेईल. तसंच माझं मत बाद झालं तरी मला खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि भाजपचं षडयंत्र हाणून पाडलं जाईल. मी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करुन न्यायालयात जायचं की नाही ते ठरवेन, अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना फोनवरुन दिलीय.
>> मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असतं, पण कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही
>> सुहास कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली
>> त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं
एक मत बाद झाल्याने आता 284/7+1 = 40.58.
म्हणजे आता मतांचा कोटा 41 झाला आहे.
त्यामुळे पहिल्या पसंतीची 41 मते ज्या उमेदवाराला पडणार तो उमेदवार विजय होणार आहे.