Rajya Sabha Election 2022 : लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? संजय राऊतांचा भाजपला खोचक सवाल, विजयाचाही दावा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 सात लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केलाय.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) शुक्रवारी मतदान पार पडलं असलं तरी अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. कारण, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतलाय. तर महाविकास आघाडीकडूनही भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र दिलं आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 सात लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केलाय.
जिंकणार तर महा विकास आघाडीच!
भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महा विकास आघाडीच! जय महाराष्ट्र!!, असं ट्वीट करत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केलीय.
भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महा विकास आघाडीच! जय महाराष्ट्र!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार!
महाराष्ट्राला वेठीस धरण्याची एकही संधी दिल्ली सोडत नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार! आज नमस्कार. ऊद्या हात सोडावा लागेल हे लक्षात ठेवा! जय महाराष्ट्र!, असंही एक ट्वीट संजय राऊत यांनी केलंय. या ट्वीटमध्ये त्यांना हात जोडलेला आपला फोटो टाकला आहे.
महाराष्ट्राला वेठीस धरण्याची एकही संधी दिल्ली सोडत नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार! आज नमस्कार. ऊद्या हात सोडावा लागेल हे लक्षात ठेवा! जय महाराष्ट्र! pic.twitter.com/H5Aw5RyA1H
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
‘ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!’
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीही एक ट्वीट करत या सगळ्या प्रकाराला रडीचा डाव असं म्हटलं होतं. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
आक्षेपाचं राजकारण जोरात!
जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.