मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) फेविकॉलपेक्षाही हिट आहे आणि फिट आहे. आम्हाला कशाचीही भीती नाही. आमचे चारही उमेदवार निवडून येणार, असा दावा शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. विधानभवन परिसरात त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा विश्वास व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदानाला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी आणि भाजपाच्या सदस्यांची धाकधुक वाढली आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाल्याने विविध पक्षांच्या सदस्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मतांचा कोटा वाढवल्याचं वृत्त आल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. या चर्चांना शिवसेना मात्र नाकारत आहे. अब्दुल सत्तारांनीही हेच वक्तव्य केलं.
शरद पवार यांनी मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. मात्र असा मतांचा कोटा वाढवण्यात आलेला नाही. ही केवळ भाजपने सोडलेली पूडी आहे. भाजपचे हे मुंगेरीलालचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच महाविकास आघाडीने केलेल्या मतांच्या नियोजनानुसारच मतदान होईल, यात तीळमात्रही शंका नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करताना अब्दुल सत्तार यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमच्यासोबत असल्याचा मोठा दावा त्यांनी केला. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे विधानसभा आमदार आहेत. मात्र तेदेखील महाविकास आघाडीला मत देणार असल्याचा दावा अब्दुल सत्तारांनी केल्याने भाजपाच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच आपलं मतदान कुणाला असेल हे मतदानाच्या दिवशीच उघड करणार असल्याचं बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलतं होतं. ठाकूर आणि त्यांचा मुलगा देखील आमच्यासोबत असल्याचा दावा सत्तारांनी केला आहे.