औरंगाबाद: येत्या काही दिवसांमध्ये राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकमेव जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मात्र, या जागेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून लॉबिंग सुरु असल्याने अद्याप प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
राज्यसभेच्या या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे इच्छूक आहेत. तर मुंबईतील काँग्रसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याकडूनही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे आता हायकमांड कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.
काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.
प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
‘राजीव तुम्हाला मिस करतेय’, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक
राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?