मुंबई : राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सध्या पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुसर पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची मदार आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. अशावेळी एक एका आमदाराचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. फोनाफोनी आणि भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील (Raju Patil) यांचं मत कुणाला असा प्रश्न विचारला जात होता? मात्र, राजू पाटील यांचं मत राज्यसभा आणि विधान परिषदेलाही भाजपलाच असेल असा दावा भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी हा दावा राज ठाकरे यांच्या भेटीनंतर केला आहे.
आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, आज राज ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याकडे जे एक मत आहे ते भाजपला मिळावं अशी मागणी केली आणि त्यांनी तत्काळ समर्थन दिलं. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठीही त्यांनी समर्थन देण्याचं मान्य केलं आहे. यावेळी शेलार यांनी राज यांचे आभारही मानले. तसंच आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांच्या मतामुळे आमचा विजय सुकर होईल, असंही शेलार यावेळी म्हणाले.
आजचं चित्र पाहिलं तर भाजपचा 100 टक्के विजय होईल. भाजप नेते, आमदार काम करत आहेत. शिवसेनेच्या स्वत:च्या आमदारांना नजरकैदेत ठेवत आहे. एका ठिकाणाहून दुसरऱ्या ठिकाणी ठेवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांना आमदारांवर विश्वास असेल तर पळवापळवी कशाला? असा खोचक सवालही शेलार यांनी केलाय.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार बोलले की आमदारांची नाराजी दूर करण्याचती गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरातांना आमदारांची नाराजी दूर करण्याचा सल्ला दिला. शक्तीप्रदर्शन तोच करतो ज्याला विजयाची खात्री नाही. आकडे असतील तर प्रदर्शनाची गरज नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही अशी माझी माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली नाही, असा दावा शेलारांनी केलाय. सगळी धावपळ सुरु आहे. भागम भाग पार्ट 2 सुरु आहे, अशी मिश्किल टिप्पणीही शेलार यांनी केलीय.