Rajya Sabha Election Result : गिरीश महाजनांच्या पीएनं जिंकली लाखाची पैज! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानंही दिला चेक, पण पीएनं सन्मानाने परत केला!
शनिवारी पहाटे निकाल लागला. महाजनांचा पीएनं पैज जिंकली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानंही इमाने-इतबारे 1 लाखाचा चेक आणला. पण महाजनांच्या पीएनं कार्यकर्त्याचा सन्मान राखत तो परत केला!
जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) रणधुमाळीत नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करत होते. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांकडूनही विजय आमचाच असं जोरजोरात सांगितलं जात होतं. आता नेतेच पेटून उठले असतील तर कार्यकर्ते मागे कसे राहणार? भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे पीए अरविंद देशमुख यांनी थेट लाखाची पैज लावली. भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणार असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर या पैजेची चांगलीच चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं ती स्वीकारली. अखेर शनिवारी पहाटे निकाल लागला. महाजनांचा पीएनं पैज जिंकली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानंही इमाने-इतबारे 1 लाखाचा चेक आणला. पण महाजनांच्या पीएनं कार्यकर्त्याचा सन्मान राखत तो परत केला!
त्याचं झालं असं की, भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिनही उमेदवार विजयी होणारच असा दावा केला होता. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर ओपन चॅलेंजही दिलं. देशमुख यांनी फक्त चॅलेंजच दिलं नाही तर 1 लाखाची पैज लावली आणि ती स्वीकारण्याचं आव्हानही त्यांनी दिलं. देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचा जळगावातील कार्यकर्ता राहुल पाटील याने ते आव्हान स्वीकारलं.
कार्यकर्त्याचा सन्मान, पैज जिंकुनही धनादेश परत केला
अखेर शनिवारी पहाटे राज्यसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स संपला. त्यात महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाली. सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे धनंजय महाडिक या जागेवर विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचा राहुल पाटील ही पैज हरला. त्यामुळे सकाळी तो 1 लाखाचा धनादेश घेऊन अरविंद देशमुखाकडे पोहोचला. ठरल्याप्रमाणे पैज हरलो म्हणून त्याने धनादेश देशमुखाकडे सोपवला. पण देशमुख यानेही कार्यकर्त्याचा सन्मान राखत तो धनादेश राहुल पाटीलला परत केला.
कुणाचे किती उमेदवार विजयी?
- भाजप – 3
- शिवसेना – 1
- काँग्रेस – 1
- राष्ट्रवादी काँग्रेस – 1
पहिल्या पसंतीची कुणाला किती मते?
- प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
- इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
- संजय राऊत, शिवसेना – 41
- पियुष गोयल, भाजप – 48
- अनिल बोंडे, भाजप – 48
सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?
- धनंजय महाडिक, भाजप – 41
- संजय पवार, शिवसेना – 33