Rajyasabha Election : चंद्रकांत खैरे, आढळराव पाटलांना डावलून शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी! संभाजीराजेंमुळेच कोल्हापूरच्या ‘मावळ्या’ला संधी?
संभाजीराजे यांनाही शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मंगळवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे 2, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केलीय. सर्वपक्षीयांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. तसंच संभाजीराजे यांनाही शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मंगळवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावाची घोषणा केली.
महत्वाची बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांना वर्षा निवासस्थानी येऊन शिवबंधन बांधण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी संभाजीराजे वर्षा निवासस्थानाकडे फिरकलेच नाहीत. शिवसेनेच्या तिकीटावर नाही तर शिवसेना पुरस्कृत म्हणून लढण्यावर संभाजीराजे ठाम राहिले. अखेर शिवसेनेकडून संभाजीराजेंना डावलून कोल्हापूरच्याच संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संजय पवार यांचं नाव जाहीर करताना मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं.
चंद्रकांत खैरेंचा पुन्हा पत्ता कट
संभाजीराजे यांनी शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेकडून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यांची खासदारकीची संधी पुन्हा एकदा हुकल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपनं औरंगाबादेत जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत सभा घेत शिवसेनेला मोठं आव्हान दिलं. तर जल आक्रोश मोर्चाद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनंही मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अशावेळी खैरे यांना संधी देत शिवसेना औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी खेळी करेल, असं वाटत असतानाही खैरे यांना उमेदवारी डावलण्यात आली.
आढळराव पाटलांनाही डावललं
शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचाही पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केल्यानंतर शिवसेनेला त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरु होती. तसंच पुणे महापालिका निवडणुकीतही आढळराव पाटलांना महत्व आहे. अशास्थितीतही आढळराव पाटलांना संधी मिळू शकली नाही.
संभाजीराजेंविरोधात कोल्हापूरचा ‘मावळा’च
संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून डावलण्यात येत आहे. एकप्रकारे शिवसेना राजेंचा, कोल्हापूरच्या गादीचा मान राखत नसल्याची चर्चा संभाजीराजे समर्थकांमध्ये आहे. अशावेळी शिवसेनेकडून कोल्हापूरचेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी देण्यात आलीय. त्यांच्या नावाची घोषणा करताना संजय राऊत म्हणाले की, ‘संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतलाय अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागी शिवसेना उमेदवार विजयी होतील. संजय पवार हे अनेक वर्षे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आहेत. कडवट शिवसैनिक आहेत, पक्का मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे जे आहोत, पक्षनेते, पक्षाचे इतर पदाधिकारी हे मावळ्यांच्या जिवावर उभे असतात’. संजय राऊतांचं हे वक्तव्य संभाजीराजेंना डावलल्यानंतर आल्यामुळे त्याला विशेष महत्वं आहे.
संभाजीराजे शिवसेनेकडून लढण्यास का तयार नाहीत?
मराठा मोर्चे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे यांचं नेतृत्व राज्यभरात मराठा कार्यकर्त्यांकडून मान्य करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामान्य माणसांमध्ये संभाजीराजे यांना वेगळं स्थान प्राप्त झालं आहे. अशावेळी एखाद्या पक्षाच्या तिकीटावर लढल्यास किंवा शिवसेनेचं लेबल लावून घेतल्यास आपला जनाधार कमी होईल, अशी शक्यता संभाजीराजे यांना वाटत आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करुन त्यांच्या तिकिटावर लढण्यास तयार नसल्याचं पाहायला मिळत आहे.