मुंबई : राज्यसभेची चौथी जागा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण याच चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांचं नाव निश्चित केलं असतानाच काँग्रेस सतीश चतुर्वेदींसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. (Rajyasabha Fourth Seat Congress Vs NCP)
महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. यात महाविकास आघाडीला 4 जागा मिळणार आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. एका जागेवर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. फौजिया खान या माजी मंत्री असल्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु अशी कुठलीच चर्चा झाला नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे या चौथ्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी खेचाखेच होत असल्याची चर्चा आहे.
राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या चारही जागांवर विजय सोपा मानला जात आहे. (Rajyasabha Fourth Seat Congress Vs NCP )
राज्यसभेवर शिवसेनेतून कोण? इथे वाचा : राज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या जागांसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना 2-2) चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
हे वाचलंत का? : काँग्रेस आमदाराच्या राजीनाम्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर
राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो.
Rajyasabha Fourth Seat Congress Vs NCP