Rajeev Satav | काँग्रेस खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, पुण्यातील रुग्णालयात ICU मध्ये उपचार

| Updated on: Apr 29, 2021 | 2:51 PM

राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली (Rajeev Satav Corona Ventilator Health Update)

Rajeev Satav | काँग्रेस खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, पुण्यातील रुग्णालयात ICU मध्ये उपचार
राज्यसभा खासदार राजीव सातव
Follow us on

पुणे : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajyasabha MP Rajeev Satav) यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गानंतर सातव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजीव सातव उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. (Rajyasabha MP Rajeev Satav Corona Positive on Ventilator Health Update from Pune Jehangir Hospital)

डॉक्टरांची काय माहिती?

राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोना संसर्गानंतर दिली जाणारी सर्व औषधं त्यांना दिली आहेत. रेमडेसिव्हीर दिलं आहे. एचआरसीटी स्कोअर 7 आणि 25 होता, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

उपचाराला प्रतिसाद, विश्वजीत कदमांची माहिती

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.

महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्समधले डॉक्टर शशांक जोशी, राहुल पंडित त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात जहांगीर हॉस्पिटलमध्ये सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.

22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

कोण आहेत राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राज्यसभेवर वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.

संबंधित बातम्या :

काँग्रेस खासदार राजीव सातव रुग्णालयात, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

शरद पवारांसह राहुल गांधींचा विश्वासू मोहरा संरक्षण विभागाच्या संसदीय समितीत

(Rajyasabha MP Rajeev Satav Corona Positive on Ventilator Health Update from Pune Jehangir Hospital)