संजय राऊतांचे दाऊदशी संबंध, गुन्ह्यासाठी राम कदमांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलनाला बसलेले भाजपचे आमदार राम कदम यांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले आहे (Ram Kadam On Sanjay Raut). “शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी स्वतःच त्यांचे गँगस्टर दाऊद इब्राहिम सोबत संबंध होते, असा खुलासा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर या दोन्ही प्रकरणात कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे (Ram Kadam On Sanjay Raut).
“संजय राऊत यांनी लाखो शिवप्रेमींची माफी मागावी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही हे आवडलेले नाही. संजय राऊत यांच्याबाबत दोन तक्रारी केल्या आहेत. संजय राऊत म्हणतात, माझे दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहेत. त्याबाबत कारवाई करा अशी मागणी मी केली आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी”, असं म्हणत राम कदमांनी घाटकोपर पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या आंदोलन केलं होतं.
“संजय राऊतांचं वक्तव्य हे अपमानजनक आहे. संजय राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी या स्वत: करीमलालाला भेटायला यायच्या. काँग्रेसचं संपूर्ण मंत्रिमंडळ हाजी मस्तानच्या स्वागतासाठी यायचं. म्हणजे संजय राऊत सरळ म्हणत आहेत की काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे गुंडांशी संबंध होते. जर संजय राऊत थेट असं म्हणत असतील, तर महाराष्ट्राचं पोलीस खातं काय करत आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. संजय राऊतांना चौकशीला का बोलवत नाही? महाराष्ट्र पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.”
“दाऊद हा गल्लीबोळातील गुंड नाही, तो आंतरराष्ट्रीय गँगस्टर आहे आणि शिवसेनेचा एक माणूस थेट म्हणतो की त्याचे दाऊदशी संबंध आहेत, मग तुम्ही काहीही कारवाई करणार नाही. पोलीस खातं काय करत आहे”, असा सवालही यावेळी राम कदमांनी उपस्थित केला. “हे पोलीस खातं सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांनी निरपेक्षपणे काम करावं”, अशी मागणी राम कदम यांनी यावेळी केली. “जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करु, त्यांनीही ऐकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, पण हे प्रकरणं तडीस नेऊ”, असंही राम कदम म्हणाले.
“इंदिरा गांधी या स्वत: करीमलालाला भेटायला यायच्या, हे काँग्रेसला चालेलं? काँग्रेस गप्प का आहे? इंदिरा गांधीविषयी काँग्रेसचं प्रेम कमी झालं आहे का, राहुल गांधींचं प्रेम कमी झालं आहे का? त्यांचं प्रेम कमी झालं असेल, पण आमचं प्रेम आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीविषयीचं संजय राऊतांचं हे वक्तव्य अपमानजनक आहे. खुर्चीसाठी तुम्ही काहीही सहन कराल? खुर्चीसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, मात्र शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, असा थेट इशारा राम कदम यांनी दिला आहे.
प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका
“संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत. छत्रपतींच्या विरोधात बोलणारी ही मुघलांची औलाद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींवर प्रेम केलं, छत्रपतींच्या आशीर्वादाने शिवसेना बनवली. त्या पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागत असतील, तर ते निश्चितपणे सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.” असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले होते.
संजय राऊत काय म्हणाले?
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ‘ठाकरे सेना’ करा, असा खोचक सल्लाही शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत यांनी उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता.
“उदयनराजे शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही”, असं संजय राऊत म्हणाले होते.
“कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या”, असं संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “देशातील अनेक नेते करीम लालाला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संगटनेला अनेक नेते भेटत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्या एवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते”, असं संजय राऊत म्हणाले.
Ram Kadam On Sanjay Raut
पाहा व्हिडीओ :