‘हा तर रोहित पवारांचा नैतिकदृष्ट्या पराभव’, राम शिंदेंचा पलटवार
राम शिंदे (Ram Shinde) यांनी फेसबुक पोस्ट करत हा मला नव्हे तर रोहित पवारांनाच (Rohit pawar) मोठा धक्का आहे. त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे, असा पलटवार केला आहे.
अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा होती. मात्र राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत हा मला नव्हे तर रोहित पवारांनाच मोठा धक्का आहे. त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे, असा पलटवार केला आहे. (Ram Shinde Answer Rohit Pawar over Ahmednagar District bank Election)
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सोपा झाला आहे. विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. याच चर्चांवर फेसबुक पोस्ट लिहित शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, “अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते तर राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते.”
“छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहित पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला. त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. निवडणूक झाली तर दारुण पराभव होईल या भीतीने आ. रोहित पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरुवात झाली आहे”, असा एल्गार राम शिंदे यांनी केला आहे.
विखे-पवारांची छुपी युती, विखेंचा ‘खास’ जिल्हा बँकेवर जाणार
जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. आमदार रोहित पवारांच्या आदेशानंतर पुढचं नियोजन सुरु झालं. त्यानुसार आता राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
रोहित पवार यांनी सुरेश भोसले यांना अर्ज मागे घ्यायला लावून तसंच ऐनवेळी विखेंशी छुपी युती करुन राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’ दाखवून दिला आहे. यापुढच्या नगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी रोहित पवारांचं हे बेरजेचं राजकारण महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे.
(Ram Shinde Answer Rohit Pawar over Ahmednagar District bank Election)
हे ही वाचा :