पक्षाच्या निर्णयाने समाधान, समितीच्या अहवालानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई : राम शिंदे
विजय पुराणिक समिती अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली
मुंबई : भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाडापाडी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केल्यानंतर पक्षाने झाडाझडतीसाठी मुंबईत बैठक घेतली होती. सकारात्मक चर्चा झाली असून अंतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर दिली. तर विजय पुराणिक समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी (Ram Shinde on BJP Meeting) दिली.
या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरमधील भाजप नेते उपस्थित होते.
प्रत्येक पक्षात नाराजी असते. आम्ही आमची बाजू देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली. मात्र अंतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात, अशी प्रतिक्रिया विखेंनी बैठकीनंतर दिली. तर भाजपबाबत राम शिंदे बोलतील, असं उत्तर सुजय विखे यांनी दिलं होतं.
दरम्यान, विखे आणि आम्ही पराभवानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आलो, असं राम शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. पक्षाला आम्ही आमच्या व्यथा आणि अनुभव सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या. विजय पुराणिक यासंबंधी अहवाल सादर करणार आहेत, त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पक्षाच्या निर्णयामुळे समाधान मिळाल्याचं शिंदेंनी सांगितलं.
नाराजी वरिष्ठांकडे मांडायची, मीडियासमोर नाही, भाजपच्या बैठकीपूर्वी विखेंचा टोला
नाराजी वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही, असं म्हणत भाजपवासी झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांना बैठकीपूर्वी टोला लगावला होता.
मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, प्रसारमाध्यमांसमोर सांगायची गरज नव्हती. पक्षाला फायदा झाला की नाही, त्याबद्दल वरिष्ठ सांगतील, पक्षात एवढं मोठं काय झालं, असं मला वाटत नाही’ असं राधाकृष्ण विखे पाटील ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले होते.
माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला होता. Ram Shinde on BJP Meeting