अहमदनगर : रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा राम शिंदे यांनी घेतलाय. ते अहमदनगर येथे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. या सरकारमधले मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारचा निष्काळजीपणा आणि नाकार्तेपणा समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय (Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election).
राम शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं कुणी ऐकत नाही असं सांगत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी येणाऱ्या 26 जून रोजी 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत.”
“सरकारमधल्या मंत्र्यांनी निर्णय करायचा असतो, मात्र दुर्दैवाने तेच आंदोलन करत आहेत. ‘कोणी कोणाचा ऐकायचं नाही ‘ हा एकच किमान समान कार्यक्रम या सरकारमध्ये आहे. एका मंत्र्याने घेतलेला निर्णय दुसऱ्याने जाहीर करायचा आणि तिसऱ्याने सांगायचा असं सुरू आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही, तर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला,” अशी टीका राम शिंदे यांनी केली.
राम शिंदे म्हणाले, “सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे वेळकाढूपणा चालू असून चांगलं काम करायला वेळ नाही. त्यांचा मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच वेळ चाललाय. सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. जर ओबीसींचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करू,” असा इशारा शिंदे यांनी राज्य सरकारला दिलाय.
Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election