संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा : मराठा आरक्षणात कायदेशीर अडचणी असल्या तरी संसदेत कायदा करुनच ही घोषणा करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर घाईगडबड करु नये. आर्थिक निकषावर 25 टक्के आरक्षण दिलं जावं यासाठी मी आग्रही असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. रामदास आठवले हे आज सातारा दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं.
“उदयनराजेंनी आरपीआयमध्ये यावं”
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा आरपीआयची ऑफर दिलीय. राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना यावेळी लोकसभेचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचं रामदास आठवले यांनी बोलून दाखवलं.
“कायदा हातात न घेता राम मंदिर व्हावं”
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबतही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. जानेवारी महिन्यात कोर्टाचा निकाल येणार आहे. त्यामुळे कायदा हातात न घेता राम मंदिर व्हावं अशी माझी इच्छा असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच बाबरी मशीद पाडणे ही चुकीची भूमिका होती, असंही ते म्हणाले.
दरम्यान, अयोध्या प्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. पण अयोध्येतील त्या जागेवर बौद्ध धर्मियांचाही हक्क असल्याचं रामदास आठवले म्हणाले.
नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबतही रामदास आठवलेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली. तुकाराम मुंढेंना लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध ठेवता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.