Ramdas Athawale : अजून सरकारचा नाही पत्ता पण आठवलेंना आत्तापासून हवा मंत्र्याचा भत्ता, 170 आमदार महायुतीसोबत असल्याचाही दावा
रिपाईचे नेते रामदार आठवलेही (Ramdas Athawale) आज गुडघ्याला बाशिंग बांधू बसल्याचे दिसून आले. कारण नव्या सरकारमध्ये आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी थेट मागणीच रामदास आठवलेंनी भाजपकडे केली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाने महाविकास आघाडी सरकारवर सध्या टांगती तलवार आहे. तिकडे एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. एकनाथ शिंदेही भाजपला (BJP) पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करताना दिसून येत आहे. तर इकडे महाविकास आघाडीचे नेते हे सरकार टिकेल असा दावा करत आहेत. आम्ही बहुमतही सिद्ध करून असेही महाविकास आघाडीचे नेते ठासून सांगत आहेत. मात्र काही भाजप समर्थक मित्र पक्षांना सत्ता बदलाची इतकी घाई झाली आहे. की अजून सरकार बदलाचा पत्ता नाही. तोपर्यंत यांनी आपल्या मागण्या पुढे करायला सुरू केल्या आहेत. रिपाईचे नेते रामदार आठवलेही (Ramdas Athawale) आज गुडघ्याला बाशिंग बांधू बसल्याचे दिसून आले. कारण नव्या सरकारमध्ये आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी थेट मागणीच रामदास आठवलेंनी भाजपकडे केली आहे.
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद हवं…
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकतात. त्यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना द्यावे, असे म्हणतानाच 170 आमदार महायुतीसोबत असल्याचा दावाही केला आहे. आठवले हे एवढ्यावर थांबले नाहीत. तर त्यांनी संजय राऊतांवर टीकेचे बाण चालवले तर एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाची फुलंही उतळली आहेत. शिवसेनेच्या या परिस्थितीला आज संजय राऊत जबाबदार आहेत, त्यांच्यामुळेच सेना बूडाली आहे, असे म्हणत आठवलेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तर एकनाथ शिदेंनी मोठी डेरिंग केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होईल, त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये एक मंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी आहे, अशी थेट मागणीच त्यांनी भाजप नेत्यांपुढे ठेवली आहे.
रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट
रवी राणा यांचे कार्यकर्तेही चेकाळले
राज्यातल्या सध्याच्या राजकीय ड्राम्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांचे कार्यकर्तेही चांगलेच सक्रिय झाले नाही. नव्या सरकारचा अजून पत्ताही नाही. तोपर्यंत रवी राणा यांच्या नावापुढे कॅबिनेट मंत्री असे लिहिलेल्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहे. नुसते कॅबिनेट मंत्रीच नाही तर अमरावतीचे पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा अशाही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे कार्यकर्तेही आधीच गुडघ्याला बाशिंगा बाधून बसले आहेत. पण राजकारणात एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत त्याबाबत अंदाज लावता येत नाही, याचा विसर या कार्यकर्त्यांना पडल्याचे दिसून येत आहे.