मला मुख्यमंत्रिपद दिलंत, तर… : रामदास आठवले
मला मुख्यमंत्रिपद दिलंत, तर चांगलं काम करेन, असं रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले विरोधकांच्या टिप्पणीवर भाष्य करताना म्हणाले.
मुंबई : ‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीचा प्रत्यय शिवसेनेला ‘मातोश्री’च्या अंगणात आलेला असतानाच आता ‘मुख्यमंत्रिपदावरील दोघांच्या भांडणात’ रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले लाभ घेताना दिसत आहेत. मला मुख्यमंत्रिपद दिलंत, तर चांगलं काम करेन, असं रामदास आठवले (Ramdas Athawale on CM) म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि समान वाटपाच्या मुद्द्यावरुन संघर्ष टिपेला पोहोचला आहे. रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा, अशी तिरकस टिप्पणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्यावर रामदास आठवले यांनी नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
या सगळ्यात माझं नाव विनाकारण घेतलं जात आहे. निवडणुकीत माझ्या पक्षाने खूप जागा जिंकल्या नाहीत. तरीही मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर, मी चांगलं काम करुन दाखवेन, असं आठवले (Ramdas Athawale on CM) म्हणाले.
बहुमत सिद्ध करण्याची ताकद, लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत
दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा इशाराही राऊत यांनी दिला.
आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं.
महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा फॉर्म्युला ठरला होता. महाराष्ट्राच्या जनतेलाच शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार भाजपने निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले.