सरकार आणणाऱ्या राऊतांवर अन्याय, संपादकपद तरी द्यायचं : आठवले
दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत. त्यांनी ठरवले असते तर ही दंगल थांबू शकली असती, असा आरोपही रामदास आठवले यांनी केला
ठाणे : ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असा टोमणा रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. (Ramdas Athawale on Sanjay Raut)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे. परंतु त्यांच्या येण्यामुळे, किंवा न येण्यामुळे महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असं सांगायलाही रामदास आठवले विसरले नाहीत.
दिल्लीमधील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत. त्यांनी ठरवले असते तर ही दंगल थांबू शकली असती. परंतु ‘आप’च्या नगरसेवकाने ही दंगल भडकवली. काँग्रेसने ती आणखी भडकवली, असा आरोपही आठवले यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार? असा प्रतिप्रश्न त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना त्यांनी विचारला.
हेही वाचा : रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच ‘सामना’ अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल
‘रिपाइं’चा मेळावा लवकरच होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. 2022 मध्ये मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंला 5-6 जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल. औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आम्ही सन्मानाने लढणार असून इथेही महायुतीची सत्ता असेल असं आठवले म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
ठाण्यातील मो. ह. विद्यालयात शांताबाई कृष्णा कांबळे यांच्या 97 व्या वाढदिवसानिमित्त केंदीय मंत्री आठवले उपस्थित राहिले होते.
Ramdas Athawale on Sanjay Raut