तुझ्यासाठी तुझ्या बापाने काय केलंय माहितीय का? आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजवरून शिवसेना बंडखोराचा मोठा सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलंय. त्यावरून शिवसेनेच्या बंडखोर नेत्याने त्यांना चांगलंच सुनावलंय.
महेश सावंत, खेडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावा अन् वरळीतून निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलंय. आदित्य ठाकरे यांना या चॅलेंजवरून शिवसेनेतील बंडखोर नेत्याने वेड्यातच काढलंय. आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांनी काय काय केलंय, हेच त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगून दिलंय. आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी विधान परिषदेचे दोन आमदार दिले. माझीही विधान परिषद आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात दिली, त्यानंतरच ते निवडून आले, असा आरोप रामदास कदम (Ramdas kadam) यांनी केलाय.आता उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
रामदास कदम काय म्हणाले?
‘आदित्य ठाकरे सध्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय. पण अरे.. तुझ्यासाठी तुझ्या बापाने उद्धधव ठाकरेंनी विधान परिषदेचे दोन आमदार दिले, तुला निवडून आणण्यासाठी. माझीही विधान परिषद तुझ्या मतदार संघात दिली. तेव्हा तू निवडून आलायस. तू काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो? प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोपटपंची आहे..असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय.
वंचितशी जागा वाटपाचं त्रांगडं…
आदित्य ठाकरे यांनी १०० जागा निवडून आणणार असं वक्तव्य केलंय. रामदास कदम यांनी या वक्तव्यावरून त्यांना वेड्यात काढलं आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. मात्र वंचित महाविकास आघाडीत नाही. त्यामुळे २८८ पैकी शिवसेनेच्या वाट्याला समजा ९० जागा आल्या. तर शिवसेनेतल्या ९० पैकीच काही जागा वंचितला द्याव्या लागणार. त्यापैकी २० जागा जरी वंचितला द्यायच्या म्हटलं तर आदित्य ठाकरे १०० जागा कुठून आणणार? का वाढवून देणार का? असा सवाल रामदास कदम यांनी केलाय.
विकास कामांसाठी खोके देणं सुरु आहे…
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचे आरोप करत आहेत. त्यावरून रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ उद्धवजींनी खोके-ओके काहीही बोलू दे. 40 आमदारांना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोके दिले जात आहेत. त्यामुळे ते निवडून येणार आहेत. आज ते एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं, हा बदल झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडली नसती. अजितदादांनी त्यांच्या माजी आमदारांना ताकद देणं थांबवलं नसतं. यातला एकही आमदार निवडून आला नसता. अजितदादा एक दमडा देत नव्हते. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला मोठा निधी देत होते.