जीभ हासडून टाकीन म्हणताय, उद्धवजी, नारायण राणे गेले तेव्हा तुमची… रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं…
ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर, असे म्हणालात. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो रामभक्त. हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळालं नाही, हे तुमचं दुर्दैव आहे, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.
कृष्णकांत साळगावकर, : कोकणातील खेड येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या सभेत लाखोंची गर्दी झाली होती. उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे गटावर धारदार टीका केली. तसेच शिवसैनिकांना भावनिक आवाहनही केलं. यावरून कोकणातले बंडखोर नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. तर नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची काय हालत झाली होती, यावरून रामदास कदम यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय. तसेच महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं हे बाळासाहेब ठाकरे यांना सहन झालं नसतं, याचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला.
काय म्हणाले रामदास कदम?
चोर अशा टीकेला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, ‘ ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर, असे म्हणालात. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो रामभक्त. हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळालं नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. तुम्हाला ते मिळेल कसं… तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. आमदारकीचा सौदा किती कोटींमध्ये झाला हे अशोक पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं. तिकिट घेण्यासाठी पैसे घेत असेल तर धनुष्यबाण शोभेल का…
नारायण राणे सेनेतून गेले तेव्हा…
रामदास कदम यांनी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून त्यांना सुनावलं. ते म्हणाले, ‘गद्दार, चोर, बेईमान, खोके… असे आरोप करतात. खोक्यात आम्ही नाही तुम्ही अडकलात. कावीळ असणाऱ्यांना दुनिया पिवळी दिसते.एखाद्या आमदाराने पैसे घेतल्याचं सिद्ध करा. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहेत. तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. पण एक गोष्ट सांगा. सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? त्यानंतर हिंदुत्वाची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांना असमान्य महत्त्व दिलं. सगळी पदं दिली. स्वतःला पद घेतलं नव्हती. मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही गद्दारी केली. अजितदादांनी ५७, काँग्रेसला ३३ टक्के शिवसेनेला १७ टक्के दिले, असा आरोप रामदास कदम यांनी केलाय.
खेडमधली शिवसेना आम्ही उभी केली
तुम्ही खेडला येऊन चूक केलीत. खेडमध्ये शिवसेना आम्ही उभी केली आहे. मिंध्यांची जीभ हासडून टाकीन असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुमच्यात हिंमत आहे का.. नारायण राणे गेले तेव्हा तुमची चड्डी पिवळी झाली होती. तुमच्या गाडीत पुढच्या सीटवर रामदास कदमला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. किती केसेस आणि आंदोलनं आहेत, तुमच्यावर? शिवसेना मोठी होण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे खून झालेत. मी साक्षीदार आहे. बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झाला. शिवसेना नावाच्या प्रायव्हेट कंपनीचा मालक आहे. सगळे नोकर आहेत. असं वागलात. म्हणून इथं लोकांना भावनात्मक आवाहन करतात आणि वागताना हुकुमशहासारखं वागता…अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.