‘चिपळूणचा लांडगा, बाटगा अधिक कडवा’… भास्कर जाधवांवर जहरी टीका
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कोकणातील भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वाद अधिक उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

कृष्णकांत साळगावकर, खेड | ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी जहरी टीका केली आहे. भास्कर जाधव यांना त्यांनी चिपळूणचा लांडगा असं संबोधलं आहे. तर वारंवार पक्ष बदलणारे असे ते बाटगे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत बाटगा अधिक कडवा असतो, त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर बोलू नये, असं रामदास कदम यांनी सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली. शिवगर्जना यात्रेदरम्यान आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर सणकून टीका केली. त्यानंतर आज रामदास कदम यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
‘चिपळूणचा लांडगा’
भास्कर जाधवांबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘ हा चिपळूणचा लांडगा आहे. बाटगा अधिक कडवा आहे. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला. पुन्हा शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा शिवसेनेत आला. हा बेईमान बाटगा आता रामदास कदमपेक्षा कडवा निष्ठावान झालाय. हा ऐहसान फरामोश आहे. तुला निवडणूक लढवण्यासाठी टेंपोच्या टेंपा चिपळूणला पाठवले होते. कपडा, साड्या, भगवे झेंडे पाठवले होते. १९९५ ला तुला तिकिट कुणी द्यायला सांगितलं होतं? मी सांगितलं होतं बाळासाहेब ठाकरेंना. त्यावेळी तू जमिनीवर लोटांगण घातलं होतंस.. अशी आठवण रामदास कदम यांनी करून दिली.
नारायण राणे बाहेर गेले तेव्हा…
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची हालत काय झाली होती, यावरून रामदास कदम यांनी जहरी टीका केली. खोक्यांचे आरोप करतायत. पण ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. एक तरी उदाहरण दाखवा. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. पण शिवसेना प्रमुख असते तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का, असा सवाल रामदास कदम यांनी केला. तसेच नारायण राणे शिवसेनेबाहेर गेले तेव्हा त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर निघतच नव्हते. निघाले तरी कुठेही फिरत असताना उद्धव ठाकरे मला गाडीत पुढच्या सीटवर बसवत होते, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
19 तारखेला उत्तर देणार
रामदास कदम यांनी येत्या १९ तारखेला सभा घेणार असून या सभेत ठाकरेंच्या सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचं म्हटलंय. सुरुवात तुम्ही केली. शेवट मी करणार. गुहागर मतदार संघाची जनता तुम्हाला उत्तर देईल, माझ्या नादाला लागू नका, अडचणीत याल. असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय.