राष्ट्रवादीकडून उस्मानाबादमध्ये पुन्हा पाटील घरण्यातलाच उमेदवार
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार अखेर जाहीर केला आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याअगोदर एकूण 16 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार अखेर जाहीर केला आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याअगोदर एकूण 16 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे एकूण 18 उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी 22 जागा लढणार आहे.
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीकडे दुसरा प्रबळ दावेदार नसल्याने पाटील घराण्यातच उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. त्यानुसार राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने उस्मानाबादचा उमेदवार जाहीर करण्याआधीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. पद्मसिंह पाटील हे निवडणूक लढविणार नसल्याचं सांगितलं जात असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने यावेळी राष्ट्रवादी पुन्हा एकदा डॉ. पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.
शिवसेनेकडून ओमराजे मैदानात
लोकसभेच्या उमेदवारी यादीत शिवसेनेने उस्मानाबादसाठी उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे. कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात नॉट रिचेबल खासदार अशी ओळख असलेल्या खासदार गायकवाड यांचे तिकिट कापण्यात आलंय. मतदारसंघात त्यांच्याविरोधात असलेली नाराजी पाहता शिवसेनेने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे आणि नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून युवा सेनेचे ते राज्य सचिव आहेत. ‘मातोश्री’चे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्तासंघर्ष सुरू झाला असून तो आजही सुरूच आहे. याच संघर्षातून ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता. कोणत्याही निवडणुका असल्या की हा संघर्ष अटळ असतो. डॉ. पाटील यांचे हाडवैरी असलेल्या ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसैनिकात जल्लोषाचं वातावरण आहे.